‘नको तो डामडौल, नको तो मॉल-राहूया स्मॉल’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2020 01:00 PM2020-06-11T13:00:26+5:302020-06-11T13:00:32+5:30

खेड्यातून शहरात आलेला आता घाबरलेला अन् गोंधळलेला माणूस म्हणतोय ‘गड्या आपुला गाव बरा.’

‘Gadya aapula gaav bara’ ...! | ‘नको तो डामडौल, नको तो मॉल-राहूया स्मॉल’

‘नको तो डामडौल, नको तो मॉल-राहूया स्मॉल’

Next

कोरोनाने जगभर हाहाकार माजवला असून मानवजातीच्या मानगुटीवर बसलेलं हे भूत काही केल्या उतरायला तयार नाही. शासन, प्रशासन प्रयत्नांची पराकाष्ठा करतंय, परंतु कोरोनाचा फैलाव रोखण्यात त्यांना यश येताना दिसत नाही. शहरातील माणसं सैरभैर झाली आहेत. परदेशातून विमानातून आलेला व्ही. आय. पी. कोरोना हळूहळू खेड्यातील बैलगाडीपर्यंत पोहोचतोय.  

कॉर्पोरेट जगतामुळे सामान्यांपासून अतिसामान्य आणि सधन असणाºया सर्वांनाच शहराचं तसं विलक्षण आकर्षण. दिल्ली, मुंबई, कोलकात्ता, चेन्नई, पुणे, नागपूर, औरंगाबादपासून ते सोलापूर शहरातील दाट लोकसंख्या त्याचंच कारण. दाट लोकसंख्येला राहायला जागा कमी पडायला लागली म्हणूनच शहरात जशा झोपडपट्ट्या उभ्या राहिल्या तशा चाळीस मजल्यापर्यंतच्या गगनचुंबी इमारतीही उभ्या राहिल्या. या इमारतीत अन् झोपडपट्ट्यात कितीतरी माणसं राहतात. खुराड्यात कोंबड्या अन् गोठ्यात शेळ्या,मेंढ्या कोंडाव्यात तशी माणसांची गर्दी मोठमोठ्या शहरातून दिसून येतेय. 

ही गर्दी म्हणजे कोरोनाचं कुरण. जेवढी गर्दी जास्त तेवढी माणसं एकमेकांना भेटतात.कोरोना संसर्ग बाधित कोण हे कुणालाही माहिती असत नाही. शासकीय रुग्णालयात भरती केल्यानंतरच कळतं की ‘आमका अन् तमका’बाधित आहे. त्यानं चौकशीत तोंड उघडेपर्यंत संपर्कातील लोकांची भंबेरी उडते. कुठे आपण संपर्कात आलो की काय? अशी शंका मनात येते अन् झोप उडून जाते.      

  सोलापूरसारख्या स्मार्ट शहराच्या महापौर देखील संसर्ग बाधित झाल्याच्या बातम्या वाचल्यावर तर धडकी भरल्याशिवाय राहत नाही. राज्याचे विद्यमान मंत्री अन् माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हेही सुरक्षित राहू शकत नाहीत ही मोठी खेदाची बाब आहे. ज्यांनी जनतेची काळजी घ्यायची तेच रुग्णालयात दाखल झाले तर सामान्य जणांनी जगायचं कुणाच्या भरवशावर.    

  शासकीय रुग्णालयात गंभीर संसर्ग बाधित रुग्णांना दाखल करून घेण्याची सोलापूरच्या शासकीय रुग्णालयाची क्षमता संपली आहे. गोरगरीब गंभीर रुग्ण आला तर त्याला‘वरतीच’ दाखल होण्याशिवाय पर्याय उरणार नाही. सोलापूरच्या शासकीय रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. औदुंबर मस्के हे टाहो फोडून सांगत आहेत. म्हणून ‘लोकमत’ म्हणतोय ‘परिस्थिती हाताबाहेर गेलीय, सोलापूरला वाचवा!’            

  सामान्यजनहो आवरा स्वत:ला, सावरा कुटुंबाला अन् मानवजातीला. डॉक्टरांनी फोडलेला आर्त टाहो काळीज पिळवटून टाकणारा आहे. शासकीय रुग्णालयात बेड रिकामे नाहीत तर खासगी रुग्णालयाची कवाडे बंद आहेत. शासनाने कारवाईचा बडगा उगारूनही गबरगंड अन् धनदांडगी रुग्णालये घाबरायला तयार नाहीत. सोलापूरच्या काही रुग्णालयातील ‘बनवाबनवी’ चालू असून शासनाच्या अन् जनतेच्या डोळ्यात धूळफेक टाकण्याचा प्रयत्न करताना ते दिसून येतात.

पुण्या, मुंबईची परिस्थिती तर विचारूच नका. सर्वच शहरात माणसांचा जीव कोंडून चाललाय, श्वास गुदमरायला लागलाय. म्हणून आज ओस पडणारी खेडी गजबजायला लागलीत. खेड्यापाड्यात  नोकरी करणारा चाकरमानी शहरात अन्  तालुक्याच्या ठिकाणी जाऊन राहायचा. आज तोही खेड्याला पसंती देतोय. त्यामुळे खेडी निश्चितच स्वावलंबी होतील. खेडी स्वयंपूर्ण होण्यासाठी गांधीजीनीही सांगून ठेवलंय ‘खेड्याकडे  चला’. जातीपातीला मूठमाती द्यायची असेल तर शहराकडे चला असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितले आहे. कोरोनाने धास्तावलेले सामान्यजण आज म्हणायला  लागलेत नको ते शहराचं आकर्षण, नको ते कॉर्पोरेट जग. ‘नको तो डामडौल, नको तो मॉल-राहूया स्मॉल’. म्हणूनच खेड्यातून शहरात आलेला आता घाबरलेला अन् गोंधळलेला माणूस म्हणतोय ‘गड्या आपुला गाव बरा.’
- अण्णासाहेब भालशंकर
(लेखक शिक्षण अन् सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत.)

Web Title: ‘Gadya aapula gaav bara’ ...!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.