बुरखा घालून दागिने चोरणारी महिलांची टोळी गजाआड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2020 05:46 AM2020-03-04T05:46:52+5:302020-03-04T05:46:56+5:30
मंद्रुप पोलीस ठाण्याच्या हद्दीत बुरखा घालून सोन्याच्या दुकानात चोरी केलेली टोळी गजाआड करण्यात आली
सोलापूर : मंद्रुप पोलीस ठाण्याच्या हद्दीत बुरखा घालून सोन्याच्या दुकानात चोरी केलेली टोळी गजाआड करण्यात आली असून, पाच महिलांसह सात जणांना अटक झाली आहे. चोरट्यांकडून १६ लाख ८८ हजार ८०३ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
शशिकांत राजेंद्र जाधव (वय ३०), राणी ऊर्फ राजेश्वरी अजय गायकवाड (वय २५, दोघे रा. रामवाडी, धोंडीबा वस्ती, सोलापूर), गौराबाई बब्रुवान जाधव (वय ५०), अरविंद यादगिरी जाधव (वय ३०), ज्योत्स्ना अरविंद जाधव (वय २६, दोघे रा. सीतारामबाग इंदिरानगर, हैदराबाद), संगीता शेखर जाधव (वय ४०), शकुंतला ऊर्फ शेकम्मा राजू गायकवाड (वय ४५, रा. सोलापूर) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. दि. ३० जानेवारी २०२० रोजी दुपारी ३ ते ४ वाजण्याच्या दरम्यान तीन बुरखाधारी महिलांनी मंद्रुप येथील अमूल्य ज्वेलर्स येथे आले. सोने खरेदी करण्याच्या बहाण्याने नजर चुकवून डब्यात ठेवलेले तीन लाख ८५ हजार रुपये किमतीचे ११ तोळे सोने चोरून नेले होते. या प्रकरणी सराफ दुकानदार अशोक महादेव पत्तार (वय ४१) यांनी मंद्रुप पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.