गजानन महाराज पालखीचे सोलापूर शहरात झाले स्वागत
By काशिनाथ वाघमारे | Published: July 10, 2024 02:36 PM2024-07-10T14:36:37+5:302024-07-10T14:36:52+5:30
पंढरपूरकडे मार्गस्थ होण्यासाठी उळे येथून बुधवारी सकाळी पालखी दिंडीचे प्रस्थान झाले.
काशिनाथ वाघमारे, सोलापूर : पांढऱ्या वेशात रांगेतील वारकरी..खांद्यावर पताके घेतलेले..शेगावीच्या राणाचा जयघोष करीत शहरात आगमन..रुपाभवानी चौकात गुलाब फुलं अथरुन रांगाेळ्याच्या पायघड्या घालून स्वागत केले.
यंदा वारीचे सलग ५५ वर्ष पूर्ण करणा-या गजानन महाराज पालखी दिंडीचे बुधवारी सकाळी रुपाभवानी चौकात आगमन झाले. यावेळी स्वागताला खासदार प्रणिती शिंदे, आमदार विजयकुमार देशमुख, पोलिस आयुक्त एम. राजकुमार, उपायुक्त विजय कबाडे, उपायुक्त दीपाली काळे, मनपा उपयुक्त मच्छिंद्र घोलप, उपायुक्त आशिष लोकरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
सोलापुरात दोन दिवसांचा मुक्काम करुन पंढरपूरकडे मार्गस्थ होण्यासाठी उळे येथून बुधवारी सकाळी पालखी दिंडीचे प्रस्थान झाले. टाळ मृदंगाच्या गजरात, गजानन महाराजांचा जयघोष करीत दिंडीने मशरुम गणपती गाठले. येथून आपला वेग वाढवला आणि तुळजापूर नाक्यावरुन रुपाभवानी चौकात दिंडीचे आगमन झाले. येथे येताच लोकप्रतिनीधी आणि प्रशासकीय अधिका-यांच्यावतीने गजानन महाराजांच्या पालखीला फुलांचा हार अर्पण करुन वारक-यांचे स्वागत केले गेले.
भक्तांनी फुलला चौक
* रांगेतील वारक-यांनी बुधवारी सकाळी १०.१५ वाजता गजानन महाराजांचा जयघोष करीत टाळ वाजवत पालखी पाणी गिरणी चौकात आणली.
* चौकात स्वागतासाठी आणि दर्शनासाठी सोलापूर शहरातील विविध भागातून नागरिकांची गर्दी लोटली.
* कर्मसाक्ष संस्थेच्या वतीने पाच किलो रांगोळी विविध आकारात साकारली. त्यावर गुलाबाची फुलं अंथरली. या संस्थेच्या २३ स्वयंसेवकांनी यासाठी परिश्रम घेतले.
महिलांनी खेळली फुगडी
पालखीच्या स्वागताला थांबलेल्या महिलांनी दर्शनानंतर रस्त्यावर फुगडी खेळून शेगावीच्या राणाचा जयघोष केला. यावेळी सोबत आलेली लहान मुलेही सहभागी झाली. त्यानंतर अनेकांनी मिठाई आणि फळं वाटप करुन भक्तीभाव व्यक्त केला.