वाखरीतून पायी वारी असल्याने गामा कमांडो तैनात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 04:17 AM2021-06-25T04:17:07+5:302021-06-25T04:17:07+5:30
आषाढी यात्रेचा आढावा घेण्यासाठी अतुल झेंडे गुरुवारी पंढरपूर येथे आले होते. यादरम्यान त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी पंढरपूर उपविभागीय ...
आषाढी यात्रेचा आढावा घेण्यासाठी अतुल झेंडे गुरुवारी पंढरपूर येथे आले होते. यादरम्यान त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी पंढरपूर उपविभागीय पोलीस अधीक्षक विक्रम कदम, पोनि. अरुण पवार, पोलीस निरीक्षक किरण अवचर, प्रशांत भस्मे उपस्थित होते.
गतवर्षी झालेल्या आषाढी यात्रेच्या सोहळ्याच्या कालावधीत लोकांमध्ये कोरोना विषयी अधिक भीती होती. त्याचबरोबर लॉकडाऊन होते. त्यामुळे वारकऱ्यांनी, भाविकांनी यात्रेसाठी पंढरीत येणे टाळले होते. परंतु सध्या अनेक लोकांनी कोरोनाच्या दोन्ही लसी घेतल्या आहेत. त्यामुळे लोक पंढरीत येण्याचा प्रयत्न करतील. त्यामुळे अधिक कडक पोलीस बंदोबस्त लावण्यात येत आहे.
त्याचबरोबर वाखरी ते पंढरपूर पायी यात्रा होणार आहे. यामुळे त्याठिकाणी स्थानिक महाराज मंडळी, मठाधिपती यात्रेत सहभागी होण्यासाठी, स्वागतासाठी जाण्याचा प्रयत्न करणार त्यामुळे त्याठिकाणी कोरोनाच्या नियमाचे पालन व्हावे, कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी योग्य नियोजन केले जाईल, असे अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी सांगितले.
:::::
डेल्टा प्लसमुळे नवीन आदेश येऊ शकतो
कोरोनाबरोबर आता डेल्टा प्लस व्हायरसचे रुग्ण मिळून येत आहेत. यामुळे आषाढी यात्रेवर याचा काय परिणाम होईल. डेल्टा प्लस व्हायरसचा संसर्ग वाढू नये, यामुळे शासन आषाढी यात्रेबाबत आणखी नवीन आदेश काढू शकते, असा अंदाज अतुल झेंडे यांनी व्यक्त केला आहे.
----
आषाढी यात्रेसंदर्भात चर्चा करताना अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, पंढरपूर उपविभागीय पोलीस अधीक्षक विक्रम कदम, पोलीस निरीक्षक अरुण पवार. ( छाया-सचिन कांबळे)