गंमतीनं प्रयोग केला अन् अंगाला चमचे चिकटले; नाणीही चिकटून राहिली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2021 03:14 PM2021-06-14T15:14:05+5:302021-06-14T15:14:11+5:30
सोलापुरातील घटना; शरीरात चुंबकीय बल तयार झाल्यानेच प्रकार
सोलापूर : अंगाला नाणी, चमचा चिकटण्याचा प्रकार सोलापुरातूनही समोर आला आहे. बँकेमध्ये सेवेत असेलेले उमेश देशपांडे यांच्या अंगाला चमचा व नाणी चिकटत असल्याचे दिसून आले आहे.
नाशिकमधील एका व्यक्तीने लस घेतल्यानंतर त्याच्या शरीराला नाणी, चमचा चिकटल्याची बातमी उमेश देशपांडे यांनी टीव्हीवर पाहिली होती. ते पाहिल्यानंतर आपणही करुन पहावे असे वाटले. तसा प्रयत्न केल्यानंतर त्यांच्याही शरीराला नाणी, चमचा चिकटले. लसीकरणाचे दोन्हीही डेस उमेश देशपांडे यांनी घेतले आहेत. १३ मे रोजी त्यांनी लसीचा दुसरा डोस घेतला होता. सहज गंमत म्हणून त्यांनी नाणी चिकटतात का हे पाहिले. नाणी चमचा चिकटल्यानंतर त्यांनी फोटोही काढले.
बायोमॅग्नेशियममुळे होऊ शकतो असा प्रकार
माणसाच्या शरीरात चुंबकीय बल तयार होते. त्याला बायोमॅग्नेशियम असे म्हणतात. शरीरात मॅग्नेशियम फिल्ड (चुंबकिय क्षेत्र) हे मेंदू, फुफ्फुस आणि ह्रदयापासून तयार होते. तसेच हिमोग्लोबिनमध्ये लोह असते. याचे प्रमाण कमी-अधिक झाल्यास वस्तू अंगाला चिकटू शकतात, असे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील भौतीक शास्त्र संकुलाचे संचालक डॉ. विकास पाटील यांनी सांगितले.
शरीराला नाणी चिकटत असल्याची नाशिकमधील घटना कळाल्यानंतर मी सहज प्रयत्न केला. माझ्या अंगाला नाणी चमचा चिकटू लागला. हे लसीकरणामुळे होत असल्याचा माझा दावा नाही. यामागे हवेच्या दाबामुळे असे होत असावे किंवा यामागे दुसरे काहीतरी शास्त्रीय कारण असण्याची शक्यता आहे.
- उमेश देशपांडे
अंगाला नाणी, चमचे चिकटण्यामागे विज्ञानाचा नियम आहे. शरीरातील काही पदार्थाचे प्रमाण कमी किंवा अधिक झाल्याने असे होऊ शकते. त्यामुळे लसीकरण आणि अंगाला चमचा, नाणी चिकटणे याचा काहीही संबंध नाही. नागरिकांनीही सोशल मीडियावर अशा बाबी शेअर करु नये. तसेच कोरोनापासून बचावासाठी अधिकाधिक नागरिकांनी लस घ्यावी.
- डॉ. विकास पाटील, भौतीकशास्त्रत्ज्ञ,