दोन ट्रक कांदा मुंबईला पाठविण्याची ऑर्डर देऊन नऊ लाखांना घातला गंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2022 05:38 PM2022-03-04T17:38:09+5:302022-03-04T17:38:14+5:30
मार्केट यार्डातील प्रकार : दोघांविरुद्ध जेलरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
सोलापूर : दोन ट्रक कांद्याची ऑर्डर देऊन सोलापूरच्याकांदा व्यापाऱ्याला नऊ लाख चार हजार ९३ रुपयाला फसवल्याप्रकरणी सोलापूर व मुंबईतील दोघांविरुद्ध जेलरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार १४ ते १७ फेब्रुवारीदरम्यान घडला.
रामकृष्ण बन्सीलाल (रा. नवी मुंबई), गुरुराज नारायणपेठकर (रा. मंगळवार पेठ, सराफ गल्ली सोलापूर) असे गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. सिद्राम कल्लाप्पा हुलसुरे (वय ५८, रा. भवानी पेठ जागृती मंदिराच्या पाठीमागे शेळगी रोड सोलापूर) हे कांदा कमिशन एजंट व खरेदी विक्रेता आहेत. सिद्राम हुलसुरे यांना १४ फेब्रुवारी रोजी एका मोबाईल नंबरवरून फोन आला. मी रामकृष्ण बन्सीलाल बोलतोय, मला दोन मालट्रक कांदा पाहिजे. कांद्याची गाडी मुंबईला पोहोचल्यानंतर तुमचे पेमेंट करतो असे म्हणाला.
सिद्राम हुलसुरे यांनी विश्वास ठेवून दुसऱ्या दिवशी दोन मालट्रक कांदा नवी मुंबई येथे पाठवून दिला. कांदा पोहोचल्यानंतर रामकृष्ण बन्सीलाल याने फर्म बिल्टीचे बिल बदलून बिल नं. ८५ एम/एस जी.वाय. नारायण पेठकर एफ १८ सिद्धेेश्वर मार्केट यार्ड सोलापूर असे केले. त्यानंतर कांद्याची विक्री केल्याचे भासवून पैसे देण्यास टाळाटाळ केली. खोटे नाव सांगून मालाची ऑर्डर दिली व नऊ लाखाला फसवले याप्रकरणी सिद्राम हुलसुरे यांनी फिर्याद दिली आहे. तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र करणकोट करीत आहेत.
यापूर्वीही घडले होते फसवणुकीचे प्रकार
सोलापुरातील मार्केट यार्डातील कांदा व्यापाऱ्यांकडून माल घेऊन फसवल्याच्या घटना यापूर्वीही घडल्या आहेत. आंध्रप्रदेश, कर्नाटक येथील व्यापाऱ्यांनीही अशा प्रकारे माल घेऊन फसवणूक केली आहे. खोटे नाव सांगून व्यापाऱ्याची फसवणूक केल्याची माहिती समजताच मार्केट यार्डातील अन्य व्यापाऱ्यांमधून चिंता व्यक्त केली जात होती.