ग्रीनफिल्डच्या बाधित शेतकऱ्यांची गांधीगिरी तलाठ्यांचा सत्कार; मोबदला वाढीची मागणी 

By दिपक दुपारगुडे | Published: December 19, 2023 06:40 PM2023-12-19T18:40:17+5:302023-12-19T18:40:27+5:30

चेन्नई-सुरत ग्रीनफिल्ड हायवेचा वाद दिवसेंदिवस चिघळत चालला आहे.

Gandhigiri Talathi felicitates Greenfield affected farmers Demand for pay rise | ग्रीनफिल्डच्या बाधित शेतकऱ्यांची गांधीगिरी तलाठ्यांचा सत्कार; मोबदला वाढीची मागणी 

ग्रीनफिल्डच्या बाधित शेतकऱ्यांची गांधीगिरी तलाठ्यांचा सत्कार; मोबदला वाढीची मागणी 

सोलापूर : चेन्नई-सुरत ग्रीनफिल्ड हायवेचा वाद दिवसेंदिवस चिघळत चालला आहे. अत्यल्प मोबदला मिळाल्यामुळे गेल्या दीड वर्षापासून शासन आणि बाधित शेतकऱ्यांमध्ये वाद सुरू आहे. अत्यल्प मोबदल्यामध्ये आमची जमीन देणार नाही या मतावर बाधित शेतकरी ठाम असताना बळजबरीने जमीन संपादित करण्याविषयी नोटीस घेऊन गावात आलेल्या तलाठ्यांचा सत्कार करत बाधित शेतकऱ्यांनी गांधीगिरी दाखवून दिली व शासनाला एक प्रकारे आव्हान दिले. वारंवार आवाहन करूनदेखील बाधित शेतकरी अत्यल्प किमतीत आपली जमीन देण्यासाठी तयार नसताना आता जिल्हा प्रशासनाकडून जमीन पोलिसांच्या मदतीने सक्तीने अधिग्रहित करण्याविषयी बाधित शेतकऱ्यांना तलाठ्याच्या माध्यमातून ३ ईच्या नोटिसा देत आहेत. 

मात्र अक्कलकोट तालुकयातील दहीटणेवाडी येथील बाधित शेतकऱ्यांनी मंगळवारी सकाळी गावात आलेल्या गाव कामगार तलाठी नुरुद्दीन मुजावर यांच्याकडून आलेल्या नोटिसा न स्वीकारता उलट त्यांचा सत्कार करत शासनाला एक प्रकारे आव्हान दिले. यावेळी सरपंच रोहित जाधव, उपसरपंच शिवलिंग हंनचेंजे, संघर्ष समितीचे चेतन जाधव, सुभाष शिंदे, अमोल काळे, नंदकुमार माने आदी उपस्थित होते.

दहिटणेवाडी येथील शेतकऱ्यांनी जी गांधीगिरी केली याचे मी समर्थन करतो व लढा आणखीन तीव्र होण्याअगोदर शासनाने तत्काळ बैठकीसाठी प्रयत्न करण्याची मी विनंती करतो. अन्यथा नव्या वर्षात जलसमाधी आंदोलन करण्याचा इशारा बाळासाहेब मोरे यांनी दिला आहे.
 
अहवाल सादर करणार
नोटिसा देण्यासाठी मी बाधित शेतकऱ्यांकडे गेलो असता त्यांच्या भावना तीव्र झाल्याचे मला कळले. त्यांनी नोटिसा घेतल्या नसून सामूहिकरीत्या विरोध दर्शविला आहे. उलट माझा सत्कार त्यांनी केला आहे. याविषयी प्रशासनाला अहवाल सादर करेन, असे तलाठी नुरुद्दीन मुजावर यांनी सांगितले.
 

Web Title: Gandhigiri Talathi felicitates Greenfield affected farmers Demand for pay rise

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.