अक्कलकोटमध्ये भक्तिभावात गणेश जयंती साजरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2021 04:23 AM2021-02-16T04:23:34+5:302021-02-16T04:23:34+5:30
जयंतीच्या पूर्वसंध्येला रविवारी सायंकाळी शेकडो महिलांनी सामूहिक अथर्वशीर्ष पठण केले. रात्री ८ वाजता ‘श्रीं’ची आरती करण्यात आली. सोमवारी सकाळी ...
जयंतीच्या पूर्वसंध्येला रविवारी सायंकाळी शेकडो महिलांनी सामूहिक अथर्वशीर्ष पठण केले. रात्री ८ वाजता ‘श्रीं’ची आरती करण्यात आली. सोमवारी सकाळी ७ वाजता मुख्य पुजारी राघवेंद्र बागेवाडीकर यांच्या हस्ते विधिवत पूजा करण्यात आली. त्यानंतर गणपती पुळे येथील गोखले गुरुजी यांच्या हस्ते पुण्याहवाचन, गणेशयाग, होम, पूर्णाहुती त्यानंतर दुपारी १२ वाजता जन्मोत्सव पाळणा कार्यक्रम झाला. ‘श्रीं’ ना महाआरती करण्यात आली. त्यानंतर महाप्रसादाला सुरुवात करण्यात आली. शेकडो गणेश भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. मंदिरावर विद्युत रोषणाई अशोक हरवाळकर यांनी केली तर पुष्प सजावट शुकुर वडकबाळ (फुलारी) यांनी केली होती.
गणेशयाग कार्यक्रमासाठी ज्येष्ठ विधिज्ञ अनिल मंगरुळे, श्रद्धा मंगरुळे, यांच्यासह सपत्नीक मल्लिकार्जुन पाटील, सतीश कलमनी, संजय कलशेट्टी, विधिज्ञ प्रशांत शहा, राजेंद्र करिमुंगी, सपत्नीक फुलारी या दाम्पत्याना मान मिळाला. दरम्यान खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी, तहसीलदार अंजली मरोड, पोलीस निरीक्षक के. एस. पुजारी, माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे, डॉ. गिरिजा राजीमवाले, नगरसेवक बसलिंगप्पा खेडगी, उत्तम गायकवाड, महेश हिंडोळे, विलास गव्हाणे, अभय खोबरे, माजी सभापती आशा इंगळे, चंद्रकांत इंगळे, बँक ऑफ इंडियाचे मॅनेजर शरणप्पा पुजारी, मुख्याध्यापक गिरीश पट्टेद, प्राचार्य वाघमोडे आदींनी दर्शनाचा लाभ घेतला.
अक्कलकोट येथील विजय गणपती येथे शेकडो महिलांच्या उपस्थितीत गणेश जयंती निमित्त जन्मोत्सव साजरा करण्यात आला.