गणेशमूर्ती विसर्जनासाठी आणल्या; संकलन केंद्रात जमा करून परतले!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2021 11:49 AM2021-09-15T11:49:52+5:302021-09-15T11:50:04+5:30
पाच दिवसांच्या गणरायाला निरोप : तलावकाठी पोलिसांचा बंदोबस्त
सोलापूर : दीड दिवस अन् त्यानंतर पाच दिवसांच्या गणरायाला भक्तिभावाने निरोप दिला. कंबर तलावावर मूर्ती विसर्जनासाठी आणल्या खऱ्या. मात्र, काहींनी गुपचुपपणे पाण्यात मूर्तींचे विसर्जन केले, तर बहुतांश भक्त संकलन केंद्रात मूर्ती जमा करून तेथून परतले. तलावाकाठी मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
काही भक्तगण गणपती विसर्जन करण्यासाठी मंगळवारी दुपारी कंबर तलाव येथे आले. तेथे पोलिसांनी त्यांना अटकाव करत त्यांना इंदिरा नगर येथील रामलिंग नगर येथील विहिरीवर जाण्यास सांगितले. तेथे गेल्यानंतर पोलिसांनी विहिरीत विसर्जन करता येणार नाही, असे सांगितले. यामुळे मूर्तींचे विर्सजन करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी लगेच मूर्ती संकलन करण्यास सुरुवात केली; पण तेथे संकलन करण्यासाठी कोणतीही व्यवस्था करण्यात आलेली नव्हती. त्यामुळे तेथे भक्तांमध्ये काही काळ संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. सकाळी रामलिंग नगर येथे मनपा कर्मचाऱ्यांकडूनच विसर्जन सुरू होते. सायंकाळी मात्र विसर्जन बंद करण्यात आले, अशी माहिती प्रशांत माने यांनी दिली.
सायंकाळी कंबर तलाव परिसरात विसर्जन
विसर्जनस्थळी पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. परिसरात नागरिकांकडून विसर्जन करण्यात येत नव्हते; पण रात्र होताच कंबर तलाव परिसरात अंधारात अनेक भक्त येऊन पूजा करतात. गणपतीचे विधिवत विसर्जन करतानाचे चित्र पाहायला मिळाले.
श्रींची विसर्जनाची सोय महानगरपालिकेने करणे गरजेचे आहे. सकाळी कंबर तलाव येथे विसर्जनासाठी गेल्यानंतर तेथे आम्हाला विसर्जन न करू देता रामलिंग नगर येथे पाठवण्यात आले. तिथे महिला पोलीस अधिकारी आल्या आणि त्यांनी विसर्जन करू नका, असे सांगत मूर्ती गोळा करण्याच्या सूचना दिल्या. आम्हाला कळलेच नाही, गणपतींचे विसर्जन होणार की संकलन होणार. त्यामुळे त्याबाबत आम्ही तेथील मनपा कर्मचाऱ्यांना विचारले असता त्यांनाही याबाबतची कोणतीही कल्पना नव्हती. यामुळे आम्हा भक्तांचा विसर्जनावेळी गोंधळ उडाला.
-डॉ. किशोर सावंत