गणेशोत्सवात मिरवणुका अन् कार्यक्रमांना बंदी; मंडपात दर्शनासाठी भाविकांना नो एंट्री..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2021 11:01 AM2021-09-09T11:01:53+5:302021-09-09T11:02:00+5:30
जिल्हाधिकारी : गर्दी केल्यास कारवाई होईल
सोलापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करा. गणेशोत्सवात मिरवणुका तसेच विविध कार्यक्रमांना बंदी असून उत्सव काळात गणेश मंडळांसमोर दर्शनासाठी भक्तांना गर्दी करण्यास मनाई राहील, असे आदेश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी बुधवारी काढले.
मागच्या आठवड्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यंदाचा गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करा, असे आवाहन केले. त्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने बुधवारी नवीन आदेश काढून गणेशोत्सव काळातील निर्बंधांची माहिती जाहीर केली. मंडपासाठी स्थानिक प्रशासनाची परवानगी बंधनकारक असून सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला ४ फुटांपर्यंत तसेच घरगुती गणेशमूर्तीला २ फुटांची मर्यादा राहील. शाडू तसेच इको फ्रेंडली गणेशमूर्ती घरच्या घरी विसर्जन करा. सार्वजनिक गणेश मंडळाजवळ भजन, कीर्तन, आरती तसेच पूजेदरम्यान भक्तांना गर्दी करता येणार नाही. फेसबुक, यूट्यूब तसेच इतर सोशल माध्यमांचा वापर करून ऑनलाइन दर्शनाची व्यवस्था करा, असे आदेशात म्हटले आहे.