ई-लर्निंगसोबत शिक्षकांनी बनविलेल्या व्हिडिओतून आनंददायी शिक्षणाची गंगा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2019 02:56 PM2019-08-09T14:56:08+5:302019-08-09T14:59:57+5:30
माझी उपक्रमशील शाळा... शिक्षणाचा सोलापुरी पॅटर्न; श्री सिद्रामप्पा हत्तुरे प्राथमिक शाळेचे विद्यार्थी स्वत: तयार करतात शिक्षणपूरक साहित्य
सोलापूर : आजच्या आधुनिक युगात शिक्षण हे एकतर्फी न राहता व्यापक बनावे. ते चार भिंतीत न राहता विद्यार्थ्यांना प्राप्त करत असलेल्या ज्ञानाचे मूर्त स्वरूप जाणून घ्यावे, यासाठी शाळेमध्ये ई-लर्निंगचा वापर करण्यात येतो. आपली ज्ञानेंद्रिये ही ज्ञानाची प्रवेशद्वारे आहेत. शैक्षणिक साधनांचा वापर करून अध्ययन, अनुभव मूर्त अधिक वास्तव असून, त्यामुळे कठीण संकल्पना स्पष्ट करणे, सहसंबंध दाखवणे, रसग्रहण करणे निरीक्षण करणे अधिक सोपे होते.
ई-लर्निंगला इंटरनेटची जोड दिल्यामुळे कोणतीही माहिती विद्यार्थ्यांना तत्काळ उपलब्ध होते. विद्यार्थी हे वेगाने व जास्त ज्ञान प्राप्त करतात. तसेच शाळेच्या शिक्षकांनी तयार केलेल्या व्हिडिओ, फोटोचा वापर करून अध्ययन, अध्यापन प्रभावी केले जाते. विद्यार्थ्यांकडून अभ्यासक्रमपूरक साहित्य तयार करून घेतले जाते. साहित्य स्वत:च बनविल्यामुळे एखादी संकल्पना समजण्यास त्यांच्या मनावर ठसवण्यास मदत होते. यामुळे विद्यार्थ्यांना नवनिर्मितीचा आनंद होतो.
नवनिर्मितीचा आनंद व अनुभव देण्यासाठी राखी, आकाशदिवा, भेटकार्ड, किल्ला, मातीच्या वस्तू, कागदकाम घेतले जाते. तसेच टाकाऊ पदार्थांपासून टिकाऊ वस्तू तयार करून घेतले जातात. अशा विविध उपक्रमांना मजरेवाडी शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेचे संस्थापक आप्पासाहेब हत्तुरे, अध्यक्ष कल्लप्पा माळी, सिद्धप्पा वरनाळ, सुधाकर कामशेट्टी यांचे मार्गदर्शन व सहकार्य असते.
विद्यार्थीच करतात नियोजन
- महापुरुषांची जयंती, स्मृतिदिन आदी कार्यक्रम शाळेमधून नेहमी घेण्यात येतात. या कार्यक्रमाचे नियोजन विद्यार्थ्यांकडेच असते. त्यातून त्यांच्यात धीटपणा, कार्यक्रमाच्या तयारीची जाण या वयातच होण्यात मदत होते. या दृष्टिकोनातून अशा पद्धतीने कार्यक्रमाची जबाबदारी दिली जाते. वाचन संस्कृती वाढावी म्हणून शाळेतील ग्रंथालयात सुमारे २ हजार ५०० पुस्तके उपलब्ध करून देण्यात आली आहेत. याचा वापर विद्यार्थी करतात. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी निर्माण तर होतेच तसेच ज्ञानवृद्धीही होते. विद्यार्थ्यांमध्ये सामान्यज्ञान वाढावे या दृष्टीने परिपाठावेळी दिनविशेष व व्यक्तिपरिचय दिला जातो. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना दररोज एक सामान्यज्ञानाचा प्रश्न विचारला जातो. विद्यार्थी हे विविध माध्यमांचा वापर करून उत्तर शोधून आणतात.
शाळेमध्ये विविध प्रकारचे उपक्रम वर्षभर घेतले जातात. यात गुणवत्ता विकास, स्पर्धा परीक्षांची ओळख, विविध स्पर्धा तसेच टॅलेंट सर्च ही परीक्षा घेतली जाते. पालकांची भूमिका महत्त्वाची असल्यामुळे त्यांना विद्यार्थ्यांच्या प्रगतीविषयी माहिती दिली जाते. यासाठी प्रत्येक वर्गाचा व्हॉट्सअॅप ग्रुप सुरू करण्यात आला आहे. या ग्रुपवरच पालकांना सूचना तसेच घरचा अभ्यास याची माहिती दिली जाते.
- सचिन जाधव, मुख्याध्यापक, श्री सिद्रामप्पा हत्तुरे प्राथमिक शाळा