सोलापूरातील कचरा डेपोचे होणार ‘आॅडिट’, प्रक्रिया करण्यावर दिला भर, लवकरच प्रकल्प अहवाल तयार करणार !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2018 12:24 PM2018-01-24T12:24:30+5:302018-01-24T12:25:27+5:30
मनपाच्या अखत्यारित असलेल्या कचरा डेपोतील साठ्याची तपासणी करण्यात येत असून या कचºयावर प्रक्रिया करून विल्हेवाट लावली जाणार आहे.
आॅनलाइन लोकमत सोलापूर
सोलापूर दि २४ : मनपाच्या अखत्यारित असलेल्या कचरा डेपोतील साठ्याची तपासणी करण्यात येत असून या कचºयावर प्रक्रिया करून विल्हेवाट लावली जाणार आहे.
आरोग्य विभागातर्फे तुळजापूर रोडवर ५१ एकरात कचरा डेपो वसविण्यात आला आहे. तसेच भोगाव रोडवरही कचरा डेपो आहे. या ठिकाणी खोदून माती काढून कचºयाची साठवणूक करण्यात आली आहे. कचºयाचे मोठे ढिगारे तयार झाले असून डेपो भरत आला आहे. येथे ओल्या कचºयावर प्रक्रिया करून वीज निर्मितीचा प्रकल्प सुरू झाल्यापासून फक्त सुका कचरा साठविला जात आहे. तरीही कचºयाचे मोठे डोंगर तयार झाले आहेत. भविष्यात कचरा डेपो कोठे करायचा, हा प्रश्न निर्माण होणार आहे. त्यादृष्टीने मनपाने साठलेला हा कचरा खाणीत गाडण्याचा प्रस्ताव तयार केला आहे.
टाटा कन्सल्टन्सीमार्फत राज्यभर कचºयावर प्रक्रिया करण्याचे प्रकल्प राबविण्यात येत आहेत. या संस्थेचे प्रतिनिधी सोलापुरात दाखल झाले आहेत. यांनी ड्रोन कॅमेºयाद्वारे तुळजापूर खतडेपोचे चित्रीकरण कचºयाचा साठा नेमका किती याचा अंदाज घेण्यास सुरुवात केली आहे. साठलेले ढिगारे व त्याचे क्षेत्र यावरून कचºयाच्या साठ्यांचा अंदाज घेतला जात आहे. याचबरोबर कचरा किती खोलीपर्यंत गाडला आहे, याचीही माहिती आरोग्य विभागाकडून घ्यावी, अशा सूचना उप आयुक्त त्रिंबक ढेंगळे—पाटील यांनी संस्थेच्या प्रतिनिधींना दिल्या.
मनपाच्या दोन साठ्यांबरोबर बाजार समितीमध्ये साठलेल्या कचºयाची पाहणी करण्यात येणार आहे. बाजार समितीच्या म्हणण्यानुसार तेथे सुमारे १२00 टन कचरा आहे. तिन्ही ठिकाणच्या कचºयाचे मोजमाप घेऊन प्रक्रिया करण्यासाठी प्रकल्प अहवाल केला जाणार आहे. याचा खर्च शासन करणार आहे.
------------------------
कामगार युनियनचे निवेदन...
- घंटागाडीवर ठेकेदारांमार्फत मजूर पुरविण्यास कामगार युनियनचा विरोध असल्याचे अशोक जानराव यांनी म्हटले आहे. उप आयुक्त त्रिंबक ढेंगळे-पाटील यांची भेट घेऊन या प्रस्तावाबाबत त्यांनी चर्चा केली. तसेच २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात कामगारांच्या देय रकमा व वेतन आयोगाचा फरक देण्याची घोषणा करून दिलासा द्यावा, या मागणीचे निवेदन महापौर शोभा बनशेट्टी यांना देण्यात आले.