१५ मे पासून सोलापूर जिल्ह्यात कचरामुक्त गाव अभियान
By संताजी शिंदे | Published: May 12, 2023 06:12 PM2023-05-12T18:12:44+5:302023-05-12T18:13:48+5:30
दिलीप स्वामी : पालखी मार्गावरील संकल्पना राबवणार प्रत्येक गावात
सोलापूर - आषाढी यात्रा कालावधीत गतवर्षी पालखी मार्गावरील गावात 'कचरा मुक्त गाव' ही संकल्पना राबविणेत आली होती. हीच संकल्पना जिल्हयात राबविणेत येणार असून १५ मे २०२३ पासून सर्व ग्रामपंचायती व गावे कचरा मुक्त करणे साठी "कचरा मुक्त गाव अभियान” सुरू करणेत येणार असल्याची माहिती सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी दिली.
सोलापूर जिल्हा परिषदेत मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्या दालनात आयोजित बैठकीत ते बोलत होते. उपमुख्य कार्यकारी अधिकारी इशाधिन शेळकंदे, शिक्षणाधिकारी माध्यमिक जावेद शेख, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव, अधिक्षक सचिन सोनकांबळे, प्रशिक्षण समन्वयक शंकर बंडगर, सनियंत्रण सल्लगार यशवंत्ती धत्तरे, घनकचरा सल्लगार मुकूंद आकुडे, संवाद सल्लगार सचिन सोनवणे, सांडपाणी तज्ञ प्रशांत दबडे, क्षमता बांधणी तज्ञ महादेव शिंदे उपस्थित होते. दिलीप स्वामी म्हणाले, जिल्हयातील सर्व ग्रामपंचायतींनी १५ मे २०२३ पासून आपली ग्रामपंचायती मध्ये ‘गाव कचरा मुक्त अभियान’ राबवयाचे आहे.
तिर्थक्षेत्राचा जिल्हा म्हणून सोलापूरला ओळखले जाते. जिल्हातून भीमा नदी वाहते. पंढरपूर येथे चंद्रभागा नदी म्हणून ओळखली जाते. ‘नमामि चंद्रभागा’ या नावाने जिल्ह्यात आपण अभियान राबविले आहे. जिल्ह्यात नदी काठा बरोबरच इतर गावात स्वच्छतेचे सातत्य टिकवून ठेवणे व गाव कचरा मुक्त करणे ही सर्वांची जबाबदारी आहे. चंद्रभागा व इतर नद्याचे प्रदूषण रोखता येईल. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५९ कलम ४५ ग्रामसूची मध्ये ग्रामपंचायत पातळीवर वैद्यकीय व आरोग्य या सदराखाली गावस्तरावर स्वच्छता राखणे आवश्यक आहे असे दिलीप स्वामी म्हणाले.
जिल्हा कचरामुक्त करण्यासाठी सर्वांचा सहभाग आवश्यक
० केंद्रपुरस्कृत स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) टप्पा २ अंतर्गत वैयक्तिक, सार्वजनिक शौचालय बांधकाम, घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन इत्यादी घटकांसाठी ग्रामीण पातळीवर अंमलबजावणी सुरू आहे. ग्रामपंचायत स्तरावर शाश्वत स्वच्छता ठेवण्याचे काम सुरू आहे. केंद्र व राज्य स्तरावरून घनकचरा व्यवस्थापन करण्याबाबत वेळोवेळी सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत. सोलापूर जिल्हयातील सर्व ग्रामपंचायतीं व पर्यायाने जिल्हा कचरा मुक्त करण्याकरीता सर्वाचा सहभाग आवश्यक आहे, असेही मुख्यकार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी सांगितले.