सोलापूरातील गारमेंट पार्क वर्षाअखेरपर्यत कार्यान्वित होणार, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांची आकाशवाणीवरील विशेष मुलाखतीत माहिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2018 06:36 PM2018-01-25T18:36:54+5:302018-01-25T18:40:04+5:30
आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून आज डॉ. राजेंद्र भोसले यांची विशेष मुलाखत प्रसारित झाली. त्या मुलाखतीत डॉ. भोसले यांनी जिल्ह्याच्या व्हिजन डॉक्युमेंटबाबत भूमिका स्पष्ट केली
आॅनलाइन लोकमत सोलापूर
सोलापूर दि. २५ : सोलापुरातील वस्त्रोद्योगाला उर्जितावस्था देण्यासाठी गारमेंट पार्क प्रकल्पाला चालना देणार असून डिसेंबर २०१८ पर्यंत गारमेंट पार्कचा प्रकल्प पूर्ण होईल, असे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी सांगितले.
आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून आज डॉ. राजेंद्र भोसले यांची विशेष मुलाखत प्रसारित झाली. त्या मुलाखतीत डॉ. भोसले यांनी जिल्ह्याच्या व्हिजन डॉक्युमेंटबाबत भूमिका स्पष्ट केली. सहाय्यक संचालक सुनील शिनखेडे यांनी ही मुलाखत घेतली. उपजिल्हाधिकारी रेश्मा माळी आणि जिल्हा माहिती अधिकारी रवींद्र राऊत यांनी मुलाखतीचे संयोजन केले.
डॉ. भोसले म्हणाले, सोलापूर जिल्ह्यात सुमारे साठ हजार लोक विडी उद्योगात, साठ हजार लोक बांधकाम व्यवसायात आणि साठ हजार लोक यंत्रमाग उद्योगातील रोजगारावर अवलंबून आहेत. विडी उद्योगाला आता फार काही भविष्य नाही. या उद्योगातील लोकांना इतरत्र रोजगार मिळायला हवा यासाठी गारमेंट पार्क प्रकल्प पूर्णत्वाकडे जाणे आवश्यक आहे. त्या अनुषंगाने गारमेंट पार्कसाठी आवश्यक असणारी जागा, आवश्यक पायाभूत सुविधा यांबाबत प्राथमिक स्तरावर चर्चा झाली आहे. याबाबतच्या सर्व प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण होऊन डिसेंबर २०१८ पर्यंत गारमेंट पार्क अस्तित्वात येईल.
सोलापूर जिल्हा आध्यात्मिक पर्यटन क्षेत्र होऊ शकते. असा विश्वास श्री. भोसले यांनी व्यक्त केला. पंढरपूर येथील विठ्ठल, अक्कलकोट येथील स्वामी समर्थ आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजाभवानी देवी यांचे देशभरात भक्त आहेत. या क्षेत्रांचा नियोजनबध्द विकास करून धार्मिक पर्यटनाचे सर्किट करण्याचे आमचे धोरण आहे, असे श्री. भोसले यांनी सांगितले.
सोलापूर जिल्ह्यातून सोळा महामार्गांचे रूंदीकरण आणि चौपदरीकरण अतिशय गतीने सुरू आहे. या कामासाठी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर निधी येणार आहे. या निधीच्या माध्यमातून कामे झाल्यावर रस्त्यांच्या प्रकल्पामुळे विकासाची प्रक्रिया अधिक गतिमान होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
जलयुक्त शिवार अभियानातून जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर कामे झाली आहेत. जिल्ह्याला गेल्या वर्षीच्या कामाबाबत राज्यस्तरावरील पुरस्कार मिळाला. यंदाही जलयुक्त शिवार अभियानातून सुमार १४ हजार कामे प्रस्तावित केली आहेत. ही सर्व कामे विहीत वेळेत पूर्ण होतील. आणि त्या त्या गावात शाश्वत पाणी साठा होईल असा विश्वास आहे, असे भोसले यांनी सांगितले.
सोलापूर विमानतळाच्या विस्तार आणि विकासाबाबत जिल्हा प्रशासन आग्रही आहे. विमानतळाच्या विकासात अडथळा ठरणाºया कारखान्याच्या चिमणी बाबत उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार कार्यवाही केली जाईल. डिसेंबर २०१८ पर्यंत याबाबतची आवश्यक प्रक्रिया पूर्ण होतील.
सोलापूरच्या पाणी पुरवठ्याबाबत ते म्हणाले, उजनीतून पाणी आणण्यासाठी ३५० कोटी रूपयांची योजना आखली आहे. त्याच्या पहिल्या टप्प्याचे काम सप्टेंबर २०१८ मध्ये सुरू होईल त्यानंतर पाण्याचा प्रश्न सुटेल.
जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले म्हणाले...
- सोळा रस्त्यांचे कामाचे भूसंपादन लवकरच पूर्ण करू.
- मार्च २०१९ पर्यंत रस्ते विकासाचे काम पूर्ण होईल.
- मेडिकल टूरिझमसाठी सोमी, सुविधा देणार.