सोलापूरचे गारमेंटस् विदेशात गेले; इथले जॅकेटस् मला नेहमी मिळतात!: PM मोदी
By रवींद्र देशमुख | Published: January 19, 2024 12:22 PM2024-01-19T12:22:18+5:302024-01-19T12:23:27+5:30
मोदी म्हणाले, सोलापुरी चादरीला कोण ओळखत नाही
रवींद्र देशमुख, सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ३७ मिनिटांच्या भाषणात सोलापूरच्या उद्योगाची प्रशंसा केली. इथला गारमेंट उद्योग आता विकसित झाला आहे. विदेशातील लोकही सोलापुरी गारमेंट खरेदी करतात. सोलापूरचे जॅकेटस् तर एक मित्र मला नेहमीच पाठवतो, असेही ते म्हणाले.
मोदी यांच्या हस्ते शुक्रवारी कुंभारी येथील रे नगरात १५ हजार कामगारांना घरांचे वाटप झाले. यावेळी ते बोलत होते. मंचावर राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार होते.
मोदी म्हणाले, सोलापूरने छोट्या उद्योगाच्या स्वरूपात गारमेंट उद्योग चांगला विकसित केला आहे. सोलापुरी चादरीचा लौकिक सर्वांनाच ठाऊक आहे. सोलापुरातील एक मित्र मला नेहमीच जॅकेटस् पाठवत असतो. त्याने अनेक जॅकेटस् पाठविले आहेत. आता मला पाठऊ नका, असे मी त्यांना सांगितलं आहे. एकूणच कापड उद्योगात सोलापूर अग्रेसर असल्याचे मोदी म्हणाले.
भाषणानंतर मोदी यांनी मॉडेल सदनिकेची पाहाणी केली. त्यांनी घरकूल लाभार्थी सुनीता आणि मुदप्पा जगले, लता आणि विजय दासरी, रिजवान आणि लालमोहम्मद मकानदार यांनी चाव्या प्रदान केल्या. याशिवाय स्वनिधी योजनेतून विजयालक्ष्मी इंगळे, अर्चना कट्टा अन् निलोफर शेख यांना प्रत्येकी दहा हजाराचे कर्ज दिले.