कर्ज थकविणाऱ्यांना चौदाशे कोटी दिले; प्रामाणिकपणे कर्ज भरणाऱ्यांना लटकावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2021 04:23 AM2021-07-28T04:23:24+5:302021-07-28T04:23:24+5:30
गेल्या चार वर्षांत राज्यात दोन वेळा शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी झाली आहे. भाजपा सरकारने सन २०१७मध्ये छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान ...
गेल्या चार वर्षांत राज्यात दोन वेळा शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी झाली आहे. भाजपा सरकारने सन २०१७मध्ये छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेव्दारे दीड लाखापर्यंतचे संपूर्ण कर्ज माफ केले, तर दीड लाखावरील कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांसाठी एक रकमी परतफेड योजना राबवली. तसेच नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रोत्साहन म्हणून प्रत्येकी २५ हजार रुपये जमा केले. सोलापूर जिल्ह्यातील एक लाख ४० हजार ९५२ शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ झाला होता.
शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती मिळाली पाहिजे, असे म्हणत सत्तेवर आलेल्या उद्धव ठाकरे यांनी महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०१९मध्ये जाहीर केली. या सरकारने दोन लाखांपर्यंतच्या जिल्ह्यातील थकबाकीदार शेतकऱ्यांसाठी ६४८ कोटी ९८ कोटी रुपये बँकांना दिले आहेत. भाजपा व आघाडी सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीसाठी जिल्ह्याला एकूण १,४७५ कोटी ५२ लाख रुपये दिले आहेत.
यामध्ये भाजपा सरकारच्या कालावधीतील दीड लाखांपर्यंतच्या संपूर्ण कर्ज माफीचे ५११ कोटी ६१ लाख, प्रामाणिकपणे कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांचे १०६ कोटी ७० लाख तसेच ओटीएसचे २०८ कोटी २३ लाख रुपयांचा समावेश आहे. प्रामाणिकपणे कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रत्येकी ५० हजार रुपये जमा करण्याची घोषणा आघाडी सरकारने दीड वर्षांपूर्वी केली होती. मात्र, शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा करण्यासाठी मुर्हूत लागला नाही.
-----
जिल्हा बँकेचे सर्वाधिक लाभधारक
भाजपा व आघाडी सरकारने केलेल्या कर्जमाफीचा जिल्ह्यातील दोन लाख १३ हजार ८२९ शेतकऱ्यांना लाभ झाला आहे. यामध्ये केवळ जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या एक लाख ३८ हजार ५१६ खातेदारांना तब्बल ८४९ कोटी २६ लाख रुपये मिळाले आहेत. इतर सर्व बँकांच्या ७५ हजार ३१३ शेतकऱ्यांना ६२६ कोटी २६ लाख रुपये मिळाले आहेत.
----
दीड लाखापर्यंतच्या ७३ हजार ४९८ शेतकऱ्यांना ५११ कोटी ६१ लाख, नियमित कर्ज भरणाऱ्या ४८ हजार ३९९ शेतकऱ्यांना १०६ कोटी ७० लाख, १९ हजार ५९ शेतकऱ्यांना २०८ कोटी २३ लाख असे ८२६ कोटी ५४ लाख, तर आघाडी सरकारने दोन लाखांपर्यंतच्या शेतकऱ्यांसाठी ६४९ कोटी रुपये दिले आहेत.
---