विनापरवाना सुरू होती गायत्री क्लिनिकल लॅब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:18 AM2021-05-29T04:18:05+5:302021-05-29T04:18:05+5:30
सध्या कोरोना संसर्गजन्य रोगामुळे रुग्ण मृ्त्यू होण्याचे प्रमाण वाढले आहे. यामुळे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला, ही बातमी समजताच अनेक ...
सध्या कोरोना संसर्गजन्य रोगामुळे रुग्ण मृ्त्यू होण्याचे प्रमाण वाढले आहे. यामुळे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला, ही बातमी समजताच अनेक रुग्णांची भीतीनेच प्रकृती अधिक बिघडत आहे. अशातच शरीरातील रक्ताची चाचणी करून विविध आजारांबाबतची माहिती पुरवणाऱ्या लॅब पंढरपूर शहर व तालुक्यात विनापरवाना चालत असल्याचे समाेर येत आहे. शहरातील गायत्री क्लिनिकल लॅबने दोन कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचे रक्ताचे रिपोर्ट अदलाबदली केल्याचा प्रकार उघडकीस आला होता.
त्यानंतर प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी याची दखल घेत उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अरविंद गिराम, नगरपरिषदेचे डॉ. बजरंग धोत्रे यांना गायत्री क्लिनिकल लॅबची कागदपत्रे तपासणी करण्यासाठी सांगितले हाेते. या तपासणीदरम्यान लॅबचालक नानासाहेब देवकर यांनी लॅब सुरू करण्यासाठी आवश्यक असलेली पॅरामेडिकलची परवानगी घेतलेली नाही. त्यांनी फक्त त्या परवानगीसाठी अर्ज केलेला आहे. तरीही लॅब सुरू केल्याचे समोर आले आहे. यामुळे त्यांना पॅरामेडिकलची परवानगी मिळेपर्यंत लॅब बंदच ठेवण्याचे आदेश देणार असल्याचे प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी सांगितले.
जिवाशी खेळणाऱ्याविरुध्द गुन्हा दाखल करा
रक्ताच्या रिपोर्टची अदलाबदली करून नागरिकांच्या जिवाशी खेळण्याचे काम लॅब चालकांकडून होत आहे. त्याचबरोबर त्यांना लॅब सुरू करण्याबाबत आवश्यक ती परवानगी नसल्याचे समजत आहे. बोगस लॅब चालकांचा शोध घेऊन त्यांच्याविरुध्द गुन्हे दाखल करण्यात यावेत, अशी मागणी रमेश आठवले यांनी केली आहे.
बोगस लॅबच्या तपासणीसाठी पथक नेमणार
सोलापूर जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणच्या रक्त तपासणी करणाऱ्या लॅबबाबत तक्रारी येत आहेत. पथक नेमण्यासाठी आवश्यक असलेल्या अधिकारांबाबत माहिती घेण्यात येत आहे. जिल्हाधिकारी व वैद्यकीय अधिकाऱ्यांशी चर्चा करून, बोगस लॅबचा शोध घेण्यासाठी पथक नेमणार असल्याचे जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी दिलीप स्वामी यांनी सांगितले.