विनाकारण फिरणाऱ्या रिकामटेड्यांवर करडी नजर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 04:18 AM2021-05-28T04:18:00+5:302021-05-28T04:18:00+5:30
कोरोनाची साखळी तोडण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी संपूर्ण जिल्ह्यात कडक निर्बंध लागू केलेले आहेत. ‘अत्यावश्यक सेवा’वगळता इतर सर्व सेवा बंद ठेवण्याचे आदेश ...
कोरोनाची साखळी तोडण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी संपूर्ण जिल्ह्यात कडक निर्बंध लागू केलेले आहेत. ‘अत्यावश्यक सेवा’वगळता इतर सर्व सेवा बंद ठेवण्याचे आदेश असतानाही या आदेशाला न जुमानता कुर्डूवाडी शहरातील व परिसरातील काही नागरिक रस्त्यांवर विनाकारण मोकाट फिरताना आढळून येत आहेत. गेल्या दोन-तीन दिवसांपासून त्यांना अडवून पोलीस नगरपालिका आरोग्य विभागाच्या साथीने त्यांची कोरोना टेस्ट केली जात आहे. त्यात काही नागरिक कोरोना पॉझिटिव्हदेखील आढळले आहेत. शहरी भागाप्रमाणेच ग्रामीण भागातही हीच स्थिती आहे.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी दोन-तीन दिवसांपूर्वी ग्रामीणच्या पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी येथील पोलीस स्टेशनला भेट देऊन आढावा घेतला होता व विनाकारण फिरणाऱ्यांची कोरोना चाचणी करा, मोकाट फिरणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यामुळे पोलीस निरीक्षक गोरख गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक चिमणाजी केंद्रे, आरोग्य निरीक्षक तुकाराम पायगण यांच्या संयुक्त पथकाने बालोद्यान चौकात मोकाट फिरणाऱ्यांची ‘ऑन दी स्पॉट कोरोना टेस्ट’ करण्याची कारवाई सुरू केली आहे.
पहिल्या दिवशी ५९ जणांच्या टेस्टमध्ये ३ जण पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले तर २६ मे रोजीच्या तपासणीत ५२ टेस्टिंग करण्यात आल्या आणि त्यात १ जण पॉझिटिव्ह आढळून आला. विना मास्क फिरणाऱ्या ३५ जणांवर, फिजिकल डिस्टन्सिंगचे नियम मोडणाऱ्या २५ व २२ मोटारसायकली जप्ती कारवाई करत एकूण ८५ जणांवर कारवाई करण्यात आली.
----
कुर्डूवाडीत मोकाट फिरणाऱ्यांवर कोरोना अँटिजन टेस्ट करून कारवाई करत असताना नगरपालिका आणि पोलिसांचे संयुक्त पथक