सोलापूर औद्योगिक क्षेत्रातील प्रदूषण कमी करण्यासाठी जर्मन कंपन्यांचा पुढाकार, ‘उजनीच्या पाणी प्रदूषणावर देशपातळीवर प्रयत्न हवेत !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2018 04:22 PM2018-01-30T16:22:32+5:302018-01-30T16:25:09+5:30
औद्योगिक वसाहतीमधील कंपन्यांमुळे होणारे वायू प्रदूषण थांबविणे, जल प्रदूषण, औद्योगिक प्रदूषण तसेच सांडपाणी प्रक्रिया पुनर्वापरात सुधारणा करण्याबाबत जर्मनीच्या विविध ११ कंपन्यांच्या पुढाकारातून चिंचोळी-कोंडी औद्योगिक वसाहतीमध्ये चर्चासत्र घडवून आणले.
आॅनलाइन लोकमत सोलापूर
सोलापूर दि ३० : औद्योगिक वसाहतीमधील कंपन्यांमुळे होणारे वायू प्रदूषण थांबविणे, जल प्रदूषण, औद्योगिक प्रदूषण तसेच सांडपाणी प्रक्रिया पुनर्वापरात सुधारणा करण्याबाबत जर्मनीच्या विविध ११ कंपन्यांच्या पुढाकारातून चिंचोळी-कोंडी औद्योगिक वसाहतीमध्ये चर्चासत्र घडवून आणले. सोलापूर इंडस्ट्रीज असोसिएशनच्या वतीने कै. जयकुमार पाटील सभागृहात जर्मनीच्या बाडन हिटम्बर्ग राज्यातील कंपन्यांचे सादरीकरण करण्यात आले.
जर्मनीतील बाडन हिटम्बर्ग या राज्याचे पथक मागील वर्षी जानेवारी २०१७ मध्ये आले होते. त्यावेळी उद्योग क्षेत्रातील समस्यांवर चर्चा झाली होती. त्यावेळी ठरल्यानुसार बाडन हिटम्बर्ग या राज्यातील ११ कंपन्यांच्या प्रमुखांनी चिंचोळी औद्योगिक वसाहतीमधील कंपन्यांशी चर्चा केली तसेच त्यांनी थरमॅक्स, एल.एच.पी. या कंपन्यांची पाहणीही केली. सध्या भारतात मेक इन इंडियाच्या माध्यमातून उद्योगाला चालना दिली जात असून याचाच हा एक भाग असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
लेटस् ब्रीज या कंपनीनेबाडन हिटम्बर्ग या राज्यातील ११ कंपनी चालकांसह १९ प्रमुखांनी चिंचोळी औद्योगिक वसाहतीमधील उद्योगाबाबतच्या समस्या ऐकून घेतल्या. यावेळी सोलापूर इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष केशव रेड्डी, माजी अध्यक्ष शरदकृष्ण ठाकरे, सचिव गणेश सुत्रावे, कमलेश शहा, अमोल गोडबोले, रामेश्वरी गायकवाड, अभिषेक तापडिया, सप्रेम कोठारी आदींसह जर्मन कंपन्यांचे पदाधिकारी उपस्थित होते.
----------------------
दृष्टिक्षेप...
- बाडन हिटम्बर्ग’ राज्यात सव्वादोन लाख कंपन्या
- जर्मन उद्योग व भारतीय कंपन्या एकत्र आणण्याचा उद्देश
- कंपन्यांच्या देवाण-घेवाणीतून भारतीय कंपन्यांतून होणारे वायू प्रदूषण थांबविणे, जल प्रदूषण, औद्योगिक प्रदूषण तसेच सांडपाणी प्रक्रिया पुनर्वापरात सुधारणा करण्याबाबत उपाययोजना केल्या जाणार आहेत.
- जर्मन उद्योग कंपन्यांचे हे पथक पुणे, सोलापूर, नागपूर व मुंबईतील कंपन्यांशी चर्चा करून प्रदूषणाबाबत उपाय सुचविणार आहेत.
- जर्मनीत लहान-लहान कुटुंबांनी सुरू केलेल्या व्यवसायाचे मोठ्या कंपन्यांत रूपांतर झाले असून बाडन हिटम्बर्ग या राज्यात सव्वादोन लाख कंपन्या आहेत.
- सोलापूरचा स्मार्ट सिटीमध्ये समावेश केल्याने तसेच सोलापुरात उद्योगवाढीसाठी वाव असल्याने सोलापूरची निवड.
- दोन दिवसातील चर्चेत प्रदूषणावर बरेच काही करता येईल, असे जर्मन कंपनी चालकांचे मत.
-------------------
...तर ‘माळढोक’ला अडचणी नाही !
- पर्यावरण स्वच्छ असेल तर माळढोक पक्ष्याला काहीच अडचण नाही. जर्मनीत २५-३० वर्षांखाली अशा समस्या आल्या होत्या; मात्र मार्ग काढून उद्योग उभारल्याचे जर्मन कंपन्यांकडून सांगण्यात आले. उजनी धरणातील पाणी प्रदूषणाच्या मुद्यावर नद्यांच्या विविध टप्प्यावर तंत्रज्ञान वापरून पाणी स्वच्छ केले पाहिजे जे जर्मनमध्ये केले जाते, अशा मोठ्या धरणातील पाणी प्रदूषणावर देश व राज्य पातळीवर प्रयत्न होणे अपेक्षित असल्याचे सांगून जर्मनीतील राईन नदी प्रदूषणाचे उदाहरण जर्मन उद्योगपतींनी दिले.