प्लास्टिकचे दुष्परिणाम जाणू या...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2019 05:13 PM2019-02-24T17:13:24+5:302019-02-24T17:15:40+5:30
दिवसेंदिवस वाढत जाणाºया प्लास्टिकच्या वापरामुळे पर्यावरणावर गंभीर स्वरुपाचे दुष्परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे. प्लास्टिकच्या पिशव्यांची पहिली समस्या म्हणजे ...
दिवसेंदिवस वाढत जाणाºया प्लास्टिकच्या वापरामुळे पर्यावरणावर गंभीर स्वरुपाचे दुष्परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे. प्लास्टिकच्या पिशव्यांची पहिली समस्या म्हणजे या पिशव्यांचं विघटन होण्यासाठी ४०० ते ५०० वर्षांचा कालावधी लागतो, म्हणजे आज आपण प्लास्टिकची पिशवी वापरून टाकून दिली तर आपल्या पुढच्या चार ते पाच पिढ्यांना या प्लास्टिकचा त्रास होऊ शकतो, याचे भान असणे अत्यंत आवश्यक आहे.
देशातील सर्व शहरे प्लास्टिकच्या कचºयापासून मुक्त करण्यासाठी केंद्रीय पर्यावरण आणि वन विभागाने प्लास्टिक-कचरामुक्त अभियान सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी ४० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या पिशव्यांवर बंदी असूनदेखील त्याचा वापर लहान-मोठे व्यापारी, भाजी विक्रेते आणि दुकानदार करत राहिले. ग्राहकांकडून याची मागणी वाढतच गेली. प्लास्टिकच्या पिशव्यांमुळे काही तासांची सोय होत असली तरी त्याचे दूरगामी गंभीर दुष्परिणाम आपल्या सर्वांसाठी, वन्यजीवांसाठी, जलस्रोतांसाठी खूपच गैरसोयीची आहे.
आपल्या देशामध्ये जवळपास ५० टक्क्क्यांहून अधिक प्लास्टिक हे फक्त एकदा वापरुन फेकून दिले जाते. तयार होणाºया प्लास्टिकच्या एकूण कचºयापैकी पुनर्वापर होणाºया प्लास्टिकचे प्रमाण अत्यल्प आहे. खरेतर प्लास्टिकचा वाढता वापर लक्षात घेता त्याच्या पुनर्निर्मितीसाठी सरकारचे धोरण आणि त्यासाठी आवश्यक असणारी सक्षम यंत्रणा उभी करणे आवश्यक आहे. प्लास्टिक पुनर्निर्माण-लघुउद्योगाच्या माध्यमातून तरुणांना स्वावलंबी बनवता येणे शक्य आहे. कुठेही टाकल्या जाणाºया पाण्याच्या रिकाम्या बाटल्या, खाद्यपदार्थांचे रॅपर्स, कॅरीबॅग्स... या गोष्टी म्हणजे आजच्या सर्वात मोठ्या समस्या बनल्या आहेत.
पाणी संपले की मोटारगाड्यांच्या खिडकीतून बाहेर टाकल्या जाणाºया असंख्य रिकाम्या बाटल्या रस्त्यावर, सार्वजनिक ठिकाणी पडलेल्या दिसतात. गड-किल्ल्यांवर आणि इतर पर्यटनस्थळांवर ज्या-ज्या ठिकाणी माणूस पोहोचला, त्या ठिकाणी कचºयाचा ढीग रचला गेला. गड-किल्ल्यांसारखा अनमोल ठेवा आज प्लास्टिकच्या कचºयाने आच्छादले जात आहेत. आपण सारेजण वेळीच जागे होणे आवश्यक आहे. मानवनिर्मित प्लास्टिकचा कचरा, वन्यजीव आणि जलस्रोतांसाठी खूपच धोकादायक ठरतोय. गायींच्या आणि म्हशींच्या पोटातून शस्त्रक्रिया करून प्लास्टिक काढल्याची अनेक उदाहरणे आपल्यासमोर आहेत. नद्यांवाटे समुद्रात पोहोचलेल्या या प्लास्टिकच्या कचºयांमुळे समुद्रजीवांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होते आहे. गोड्या पाण्याच्या जिवंत जलस्रोतांमध्ये प्लास्टिक अडकल्याने ही स्त्रोते बंद होत आहेत. पाण्याचा निचरा होण्याच्या मार्गावर प्लास्टिकमुळे अडथळा येऊन मोठ्या शहरांमध्ये सांडपाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. अशाप्रकारे प्लास्टिकच्या वापरामुळे आणि त्यातून निर्माण होणाºया कचºयामुळे सध्या आणि भविष्यामधेही आपल्याला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागणार आहे.
एक सर्वसामान्य पण जबाबदार नागरीक म्हणून आपण प्लास्टिकचे दुष्परिणाम वेळीच जाणायला हवे. वास्तविक पाहता प्लास्टिक आपला शत्रू नाही, परंतु ज्या प्रकारे गरज नसताना प्लास्टिकचा मोठ्या प्रमाणात वापर होतोय, काम संपल्यानंतर ज्याप्रकारे बेफिकीरपणे ते इतरत्र टाकले जाते, ते थांबवणे आवश्यक आहे. बºयाचवेळेस आपण स्थानिक प्रशासन, अधिकारी यांना दोष देतो. परंतु समाजातला एक जबाबदार घटक म्हणून आपणही समाजाचे काही देणे लागतो, ही भावना जोपासणे आणि या भावनेतून आपली विधायक अशी कृतिशील वाटचाल सातत्याने सुरु ठेवणे, ही आजची गरज बनली आहे.
पर्यावरणाचं संवर्धन, वन्यजीवांची सुरक्षा या गोष्टींच्या माध्यमातून आपण आपल्या पुढच्या पिढीची एकप्रकारे काळजीच घेतोय, हे प्रत्येकाने लक्षात घेतले पाहिजे. आपण आपल्या मुला-मुलींना त्यांच्या भविष्यासाठी सक्षम बनवतानाच, त्यांना पुढे जाऊन आवश्यक असणारे आॅक्सिजन, सुंदर निसर्ग, सुंदर पर्यटनस्थळे आणि विविध वन्यजीव.... यासाठी आज, आता आपल्याला या गोष्टींची काळजी घ्यावी लागणार आहे.
- सिद्धेश्वर म्हेत्रे
(लेखक पर्यावरणपूरक चळवळीत सक्रिय आहेत)