कोळपणीसाठी बैलजोडी मिळंना; आता सायकल कोळप्यानं आंतरमशागत उरकेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2020 12:12 PM2020-07-16T12:12:28+5:302020-07-16T12:14:52+5:30
अक्कलकोट तालुक्यातील परिस्थिती; दमदार पावसामुळे खरिपातील पिके जोमात
अक्कलकोट : यंदा वेळेवर पाऊस झाल्यामुळे शेतकºयांनी ट्रॅक्टरद्वारे झटपट पेरणी केली; मात्र आता आंतरमशागत करण्यासाठी बैलजोडी मिळेना झाली़ अखेर सायकल कोळप्यानंच कोळपणी सुरू केली असून ती उरकेना, असे शेतकºयांनी सांगितले़.
यंदा वेळेवर पाऊस झाल्यामुळे प्रथमच जून महिन्यात खरिपातील उडीद, तूर, मूग, भुईमूगसह अन्य प्रकारच्या पिकांची पेरणी केली. क्षेत्र जास्त आणि बैलजोड्यांची संख्या कमी यामुळे शेतकºयांनी झटपट पेरणी उरकण्यासाठी ट्रॅक्टरचा मोठ्या प्रमाणात वापर केला़ खरीप हंगामातील पेरणी वेळेवर झाली़ प्रत्येक नक्षत्रात पाऊसही पडत गेला़ त्यामुळे पेरणी केल्यानंतर पिकांची उगवण चांगली झाली आहे; मात्र पावसामुळे आता या पिकांत तण वाढलेले आहे. त्यामुळे आंतरमशागत करण्यासाठी बैलजोड्यांचीच आवश्यकता असते़ ट्रॅक्टरद्वारे आंतरमशागत करता येत नाही.
सध्या बैलजोड्यांची संख्या कमी झाली आहे़ शिवाय सर्वच शेतकºयांना बैलजोडी वेळेवर उपलब्ध होत नाहीत़ मात्र तण वाढत असल्याने अक्कलकोट तालुक्यातील शेतकरी आंतरमशागतीसाठी सायकल कोळप्याचा वापर करताना दिसतात.
सायकल कोळप्याला पसंती
सध्या बैलजोड्यांची संख्या कमी झाल्यामुळे शेतकरी आंतरमशागतीसाठी सायकल कोळप्याला पसंती देताना दिसतात़ एक व्यक्ती दिवसभरात सायकल कोळप्याने एक ते दीड एकर क्षेत्र आंतरमशागत करू शकतो़ हेच काम मुजरीवर एका महिलेला किमान दोन हजार रुपये मोजावे लागतात़ तणनाशक फवारायचे म्हटल्यास जवळपास एक हजार रुपये खर्च येतो़ सर्वच शेतकºयांकडे बैलजोड्या नाहीत़ त्यामुळे शेतकरी सध्या तूर, मूग, उडीद, सोयाबीन या खरीप पिकात आंतरमशागतीसाठी सायकल कोळपणीला अधिक पसंती देत असल्याचे दिसून येते़
यंदा सर्वच नक्षत्रात चांगला पाऊस झाला आहे़ त्यामुळे तालुक्यात खरिपाची पेरणीही वेळेवर झाली़ त्यामुळे सध्या सर्वच पिके जोमाने आली आहेत़ शिवाय सततच्या पावसामुळे या पिकांत तण वाढत आहे़ शिवाय आमच्याकडे बैलजोडी नाही़ त्यामुळे सायकल कोळपणीद्वारे आंतरमशागत करीत आहे़
- मल्लिनाथ भासगी,
शेतकरी, सलगर