घाटणे ग्रामपंचायत चौकशीसाठी आता त्रिस्तरीय समिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:30 AM2021-06-16T04:30:51+5:302021-06-16T04:30:51+5:30
मोहोळ तालुक्यातील घाटणे गाव संपूर्ण कोरोनामुक्त करून नागरिकांना सर्व सुविधा पुरवत गावात फवारणी केली. कोरोनाच्या चाचण्या केल्या, अशी ...
मोहोळ तालुक्यातील घाटणे गाव संपूर्ण कोरोनामुक्त करून नागरिकांना सर्व सुविधा पुरवत गावात फवारणी केली. कोरोनाच्या चाचण्या केल्या, अशी माहिती सरपंच ऋतुराज देशमुख यांनी मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवली होती. प्रत्यक्ष गावांमध्ये कोरोना महामारीच्या काळात कुठलीही सुविधा दिली गेली नाही. सरपंचांनी स्वत:च्या वाॅर्डात मोजक्याच लोकांना मास्क व किटचे वाटप केले आहे. गावात आजही कोरोनाचे रुग्ण उपचार घेत आहेत. अशी परिस्थिती असताना गाव कोरोनामुक्त झाले, अशी खोटी माहिती प्रसिद्धीसाठी देऊन प्रशासनाची व घाटणे ग्रामस्थांची दिशाभूल करणाऱ्या घाटणे गावचे सरपंच व संबंधित अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी, या मागणीसाठी घाटणे येथील ग्रामस्थांनी पंचायत समिती कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले होते.
----
यावेळी सचिन शिराळ, बाळासाहेब देशमुख, कुंडलिक गायकवाड, किरण देशमुख, समाधान गायकवाड, गुलचंद गायकवाड, लक्ष्मण बनसोडे, प्रमोद सावंत, विश्वास गायकवाड, तानाजी गायकवाड, बबलू सावंत, मालिकार्जुन कारंडे, राजकुमार गायकवाड, संदीप माने, गुंडिबा बनसोडे, बबलू बनसोडे,
आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
-----
मुख्यमंत्र्यांना कोणतीही माहिती दिली नाही
याबाबत गटविकास अधिकारी गणेश मोरे यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे. घाटणे ग्रामपंचायतीने केलेल्या पिण्याच्या पाण्याच्या आर.ओ. प्लांट व ग्रामपंचायत दुरुस्ती या कामाची लेखी माहिती तक्रारदारांना देण्यात येत आहे. तसेच आपल्या तक्रारीच्या अनुषंगाने घाटणे गावाबाबत राज्याचे मुख्यमंत्र्यांना घाटणे गावासंबंधी कोणतीही माहिती या कार्यालयाकडून देण्यात आली नव्हती. ग्रामपंचायतीमध्ये कोरोनाविषयक झालेल्या कामाची तपासणीसाठी तालुका वैद्यकीय अधिकारी, अरुण पाथरुडकर, नरखेड प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. बंडगर, व पंचायत समितीचे विस्तार अधिकारी ए. एम. वाघमोडे यांची त्रिसदस्यीय समिती नेमली आहे. चौकशी करून आपणांस अहवाल देण्यात येईल, असे लेखी पत्र दिल्याने तूर्तास उपोषण मागे घेण्यात आले आहे.
-----
- घाटणे लोकसंख्या ९५३
- कुटुंब २००
- कोरोनाचे एकूण रुग्ण- १४
- मृत्यू : २
- लसीकरण ११७
- रॅपिड टेस्ट २५०