मुलगी म्हणतेय माझं स्टेट्स कमी होईल; टक्कल पडलेल्या मुलाशी लग्न नको गं बाई...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2022 04:57 PM2022-01-11T16:57:56+5:302022-01-11T16:58:01+5:30
ड जीवनसत्त्वाची कमी : लॉकडाऊनमुळे मिळेना पुरेसा सूर्यप्रकाश
सोलापूर : साधारणपणे अनेकांचे केस हे गळत असतात. एका विशिष्ट संख्येपर्यंत केस गळणे सामान्य असू शकते, परंतु तरुण वयातच केस जास्त प्रमाणात गळत असतील तर तो चिंतेचा विषय बनतो. केस गळण्याची अनेक कारणे असून लग्नाआधी टक्कल पडलेल्या मुलाशी कसे लग्न करणार, असा प्रश्न अनेकांपुढे आहे.
थायरॉईडच्या समस्या असतानाही केस गळतात. थायरॉईड ग्रंथी ही शरीरातील एक महत्त्वाची ग्रंथी आहे, ज्यामध्ये असंतुलन निर्माण झाल्यास शरीराला अनेक समस्यांमधून जावे लागते. केस गळतीचे हेदेखील एक कारण आहे. जर हायपोथायरॉईडीझम आणि हायपरथायरॉईडीझमचा सामना करावा लागत असेल तर त्याकडे दुर्लक्ष न करता लगेच डॉक्टरांची मदत घेणे गरजेचे असते. टक्कल पडल्याच्या कारणांचा शोध घेऊन गरज पडल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने ट्रान्सप्लांट करता येते.
-------
केस गळू नये म्हणून...
आहारात ड जीवनसत्त्वाचा समावेश करावा. लॉकडाऊनमुळे मुले घराच्या बाहेर पडत नाहीत. कमी खेळतात. त्यामुळे त्यांना व्हिटामिन डी पुरेसे मिळत नाही. त्यामुळे बाहेर पडून कोवळे ऊन अंगावर घ्यावे. योग्य आहार घ्यावा. ज्यात दूध, दही, चीज, पनीर असे पदार्थ असावेत. जेवणात पालेभाज्यांचा समावेश करावा.
----------
हे देखील कारण..
वजन कमी करण्यासाठी केलेले असंतुलित डाएटिंग, गरोदरपणा, प्रसूती किंवा रजोनिवृत्तीमुळे हॉर्मोनमध्ये होणारे बदल किंवा असंतुलन यामुळे तात्पुरती केसगळती होऊ शकते. शरीरातील अनेक हॉर्मोनच्या पातळीवर केसांची वाढ अवलंबून असते. थायरॉईड, टेस्टोस्टेरॉन, इस्ट्रोजेन हे त्यातील काही महत्त्वाचे घटक आहेत.
--------
रक्त कमी असणे, थॉयरॉईडचा दोष असणे, आहारात प्रथिनांचा अभाव हे केस गळण्याची मुख्य तीन कारणे आहेत. केस गळत असल्यास हिमोग्लोबिन व थॉयराईडची तपासणी करून प्रथिनयुक्त आहाराचा खाण्यात समावेश करून तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
- डॉ. सचिन कोरे, त्वचारोगतज्ज्ञ
---------------
टक्कल पडलेला नवरा नको गं बाई...
टक्कल असलेल्या मुलाला मुलगी शोधणे तसे अवघड जाते. टक्कल असलेल्या मुलांना मुली नापसंत करतात. तो मला शोभत नाही, आमची जोडी व्यवस्थित दिसणार नाही. त्याच्याशी लग्न केल्यावर माझे स्टेट्स कमी होईल, अशी कारणे मुलींकडून सांगितली जातात.
- अर्जुन मागाडे, प्रमुख, वधू-वर सूचक मंडळ