सालगड्याच्या मुलाशी प्रेमविवाह केलेल्या मुलीचा आई-वडिलांनी केला खून, मंगळवेढा येथील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2018 11:37 AM2018-10-06T11:37:11+5:302018-10-06T11:38:08+5:30
मंगळवेढा : सालगड्याच्या मुलासोबत प्रेमविवाह केल्याने संतापलेले वडिल व सावत्र आई यांनी २२ वर्षीय बी.ए.एम.एस.चे शिक्षण घेणाºया मुलीस जिवे मारून तिच्यावर अंत्यसंस्कार करून पुरावा नष्ट केल्याप्रकरणी वडिल विठ्ठल धोंडीबा बिराजदार व सावत्र आई श्रीदेवी विठ्ठल बिराजदार यांच्याविरूध्द पोलीसांनी गुन्हा दाखल करून दोघांना रात्री उशिरा अटक केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, यातील मयत अनुराधा विठ्ठल बिराजदार(वय २२ वर्षे) हिने सालगड्याच्या मुलाशी प्रेमविवाह केला होता. सदर मयत ही कर्नाटकातील सिंदगी येथे बी.ए.एम.एस.चे शिक्षण घेत आहे. तेथे जावून त्या मुलाने प्रेमविवाह केला होता. प्रेमविवाहाचे वृत्त वडिल तथा आरोपी विठ्ठल बिराजदार यास समजल्यानंतर सिंदगी येथे जावून मयतास तात्काळ घेवून आले व दि.२ आॅक्टोबर रोजी पहाटे १.३० वा.बोराळे येथील फियार्दी बाळासाहेब म्हमाणे यांच्याकडे सोडून गेले. प्रेमविवाहाच्या बदनामीमुळे मयताचे वडिल संतापले व त्यांनी फियार्दीस मुलीने सालगडी असलेल्या मुलाबरोबर प्रेमविवाह केल्याचे सांगून तिला तेथे सोडून गेले. यावेळी जाताना आरोपीने माझी बदनामी झाली आहे, तिला आता जिवंत ठेवणार नाही असे म्हणून आरोपी निघून गेला. दि.४ रोजी दुपारी १.३० वा.च्या दरम्यान आरोपीने बोराळे येथे येवून अनुराधाची तोंडी परीक्षा राहिली आहे. तिला घेवून जातो असे सांगून इनोव्हा गाडीतून घेवून गेला व दि.५ आॅक्टोबर रोजी सलगर येथे अनुराधा हिला दोघा पती-पत्नींनी जिवे ठार मारून शेतात पहाटे ४ वा.अंत्यविधी उरकला. मयत अनुराधा हिने मृत्यूपूर्वी दोन चिठ्या लिहून ठेवल्या होत्या.
त्यामध्ये वडिल व सावत्र आई यांच्यापासून माज्या जिवीताला धोका आहे, ते मला मानसिक त्रास देतात, मला मारण्याचा प्रयत्न करीत आहेत हे माज्या लक्षात आले असून माझा मृत्यू झाल्यास त्यांना जबाबदार धरण्यात यावे असे चिठ्ठीत नमुद करण्यात आल्याचे दिलेल्या फियार्दीत बाळासाहेब म्हमाणे यांनी म्हटले आहे. या घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव मारकड करीत आहेत. दरम्यान, पोलीस निरीक्षक प्रभाकर मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार दत्तात्रय तोंडले व पो.कॉ.संजय गुटाळ यांनी दोन्ही आरोपींना सलगर येथून कसोशिने ताब्यात घेतले.