आईच्या घरातून चोरी झालेले सोने १३ वर्षांनी मुलींना मिळाले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2019 10:33 AM2019-08-31T10:33:21+5:302019-08-31T10:35:59+5:30
तीन वर्षांपूर्वी आईचे झाले निधन; सोने हातात येताच तिन्ही मुलींना कोसळले रडू
रुपेश हेळवे
सोलापूर : तेरा वर्षांपूर्वी आईच्या घरातून २० तोळे दागिने चोरीस गेले... त्यानंतर १० वर्षांनंतर तिचे निधनही झाले... दागिने मिळतील याची आशा पोटच्या तीनही मुलींनी सोडून दिली होती... मात्र देव देतो, यानुसार तपास लागला अन् चोरीस गेलेले दागिने शुक्रवारी न्यायालयामार्फत परत घेताना तिघींच्या नेत्रातून आनंदाश्रू वाहत होते. जणू स्वर्गवासी आईचीच ही भेट असल्याची भावना त्यांच्या चेहºयावर स्पष्टपणे जाणवत होती.
सलगर वस्ती भागात राहणाºया यल्लूबाई गायकवाड यांना अन्नपूर्णा नागनाथ जाधव, नंदा मारुती जाधव आणि रंजना सिद्राम जाधव या तीन विवाहित मुली.१३ डिसेंबर २००६ रोजी यल्लूबाई परशुराम गायकवाड ( वय ७१ वर्षे ) यांच्या घरात चोरी झाली होती़ यामध्ये यल्लूबाई यांचा १ सोन्याचा शकुंतला हार, सोन्याचा मोहनहार, ४ सोन्याच्या बांगड्या, १ सोन्याचा लक्ष्मीहार, २ सोन्याच्या अंगठ्या व १ चांदीची लक्ष्मीची मूर्ती असा ऐवज चोरीला गेला होता.
या घटनेची फिर्याद सलगरवस्ती पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाली होती. तपासात पोलिसांनी प्रमोद उर्फ काल्या विजय जाधव व गणेश यल्लप्पा जाधव यांना दोघांना अटक केली होती. यातील आरोपी प्रमोद जाधव याने पोलिसांना आपण चोरी करून वरील मुद्देमाल लातूरमधील सोनार विलास जाधव यास विकून १ लाख ४० हजार रक्कम घेतल्याचे कबूल केले. या सोन्याची लगड विलास जाधव यांनी केली. त्यामुळे सदर सोनार यास पोलिसांनी साक्षीदार करुन सदर सोन्याची २० तोळ्यांची लगड व चांदीची लक्ष्मीची मूर्ती जप्त केली होती. त्यानंतर सदर केसची सुनावणी ही प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी सोलापूर यांच्या न्यायालयात सुरु झाली.
त्यावेळेस या केसमध्ये सोनार जाधव यास साक्षी समन्स काढल्यानंतर सोनार जाधव हा न्यायालयात हजर होत त्याने सदर २० तोळ्यांची सोन्याची लगड स्वमालकीची आहे, असे सांगत लगडच्या मागणीचा अर्ज न्यायालयात दाखल केला. त्याचवेळी मूळ फिर्यादी यल्लूबाई गायकवाड यांनी देखील सोन्याची लगड मागणी अर्ज करत चोरीचे सोने विकत घेणाºया सोनार जाधव यास आरोपी करण्याचा अर्ज दाखल केला. त्यानुसार तत्कालीन प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी सोलापूर यांनी सोनार विलास जाधव यास सदर गुन्ह्यात आरोपी केले. त्यानंतर या केसची सुनावणी होऊन दोन्ही आरोपी निर्दोष सुटले. तसेच सोन्याची लगड सोनार जाधव यास देण्याचा प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी सोलापूर यांनी २ जुलै २०१६ रोजी हा निकाल दिला होता.
यादरम्यान सदर निकाल झाल्यानंतर लगेचच दोन महिन्यातच २६ आॅगस्ट २०१६ रोजी हदयविकाराच्या झटक्याने यल्लूबाई परशुराम गायकवाड यांचा मृत्यू झाला़ त्यानंतर जाधव यांच्या वारसदार मुली रंजना सिद्राम जाधव, अन्नपूर्णा नागनाथ जाधव, नंदा मारुती जाधव यांनी सोलापूर जिल्हा न्यायालयात वरील निकालास आव्हान दिले. त्याप्रमाणे सोलापूर जिल्हा न्यायालय येथे प्रमुख जिल्हा न्यायाधीश श्रीकांत आणेकर यांच्यासमोर सदर अपिलाची सुनावणी होऊन सोन्याची लगड गायकवाडच्या वारसदारांना देण्याचा आदेश केला. यानुसार शनिवारी ३० आॅगस्ट रोजी सदर सोन्याची लगड वारसदार रंजना जाधव, अन्नपूर्णा जाधव, नंदा मारुती जाधव यांना मिळाली. यल्लूबाई गायकवाड यांचे वारसदार रंजना जाधव, अन्नपूर्णा जाधव व नंदा जाधवतर्फे अॅड. विद्यावंत पांढरे यांनी तर सरकारतर्फे अॅड. शैलजा क्यातम यांनी काम पाहिले.
केस हरल्यामुळेच आईचे निधन झाले़ पण एकेदिवशी आई माझ्या स्वप्नात आली आणि अपील करण्याचे सांगितले. यामुळे मी पुन्हा केस लढण्याचा विचार केला़. यानुसार अॅड. विद्यावंत पांढरे यांच्या वतीने आम्ही अपील केले आणि अॅड. पांढरे यांच्यामुळेच आम्ही हरलेली केस तर जिंकलो पण आईचे स्वप्न पूर्ण केल्याचा जास्त आनंद आम्हाला झाला आहे.
- नंदा जाधव, वारसदार मुलगी