उच्च शिक्षणाची फी भरण्यासाठी पैसे नसल्याने मुलीची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2019 02:22 AM2019-07-25T02:22:24+5:302019-07-25T02:22:37+5:30
बी. टेकला प्रवेश झाला होता निश्चित
वाळूज (जि़ सोलापूर) : बारावीनंतर उच्च शिक्षणाची फी भरण्यासाठी वडिलांजवळ पैसे नसल्याने निराश झालेल्या रूपाली रामकृष्ण पवार (१७) या विद्यार्थिनीने मंगळवारी मध्यरात्री कीटकनाशक प्राशन केले. सोलापूरच्या सरकारी रुग्णालयात उपचार सुरू असताना बुधवारी तिचा मृत्यू झाला.
सोलापूर जिल्ह्यातील देगाव येथील रूपालीला १२ वी विज्ञान शाखेत चांगले गुण मिळाले होते. पंजाबमधील जालंधर येथील लव्हली प्रोफेशनल अकादमीत तिचा बी.टेक.साठी प्रवेश निश्चित झाला होता. तिला सीईटी परीक्षेत ८९ गुण मिळाले होते. दहा हजार रुपये भरून तिने प्रवेश निश्चित केला.
उर्वरित एक लाख रुपये भरण्यासाठी २० जुलै ही अंतिम मुदत होती. मात्र मुदतीत फी भरणे शक्य झाले नाही. त्यामुळे रूपालीने कीटकनाशक प्राशन करून जीव दिला. तिच्या पश्चात आई, वडील, तीन विवाहित बहिणी व एक लहान भाऊ आहे. अभ्यासात हुशार मुलीला केवळ पैशांअभावी शिक्षण घेता आले नाही. तिने आत्महत्या केल्याने हळहळ व्यक्त होत आहे.
रामकृष्ण पवार यांना आठ एकर शेती आहे. त्यावर त्यांचा उदरनिर्वाह चालतो. सततच्या दुष्काळाने ते हतबल झाले होते. त्यांनी शेती विकायला काढली होती; मात्र शेतीला कवडीमोल भाव येत असल्याने त्यांनी विकले नाही, असे त्यांच्या नातेवाईकांनी सांगितले.