जीआयएस सर्वेक्षणात २० टक्के चुका, दुरुस्तीचे काम सुरू, तपासणीसाठी ६४ जणांचे पथक नियुक्त
By admin | Published: June 23, 2017 02:19 PM2017-06-23T14:19:32+5:302017-06-23T14:19:32+5:30
-
आॅनलाइन लोकमत सोलापूर
सोलापूर दि २३ : जीआयएस (जिओग्राफिक इन्फॉर्मेशन सर्व्हिस) सर्वेक्षणातून शोधलेल्या मिळकतीतून करआकारणी केलेल्यांमध्ये २० टक्के चुका आढळल्याचे क्रॉस तपासणीतून आढळले आहे.
पुण्याच्या सायबर टेक कंपनीला शहरातील जीआयएस सर्वेक्षणाचा मनपाने ठेका दिला आहे. या कंपनीने शहरातील ५२ पेठांपैकी ४९ पेठांचे सर्वेक्षणाचे काम पूर्ण केले आहे. ४९ पेठात पूर्वीच्या ७९ हजार ८३ इमारतींची नोंद होती. सर्वेक्षणात १ लाख ८२ हजार ७७२ मिळकती आढळल्याचे सांगण्यात येत आहे. या सर्वेक्षणात नोंद नसलेल्या १७ हजार २५९ मिळकती आढळल्याचे नमूद करण्यात आले आहे. अद्याप बुधवारपेठ, विडी घरकूलसह काही पेठांचे काम पूर्ण झालेले नाही. यात ३४ हजार ४८८ मिळकती शिल्लक असल्याचे सांगण्यात येत आहे. २०१४ नुसार मनपाकडे २ लाख २ मिळकतींची नोंद होती. त्यात खुले प्लॉट ५० हजार २७० तर १ लाख ४९ हजार ७३२ इमारतींचा समावेश होता. जीआयएस सर्वेक्षणात आतापर्यंत यातील १ लाख ८४ हजार ४८० मिळकतींचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यात ९ हजार ४६८ ओपन प्लॉट तर १ लाख ७५ हजार १२ इमारती आढळल्या आहेत. या इमारतीत २९ हजार ३७९ भाडेकरू राहत असल्याचे निष्पन्न झाले आहे.
कंपनीने हे सर्वेक्षण २०१४ पर्यंतचा डाटा घेऊन केलेले आहे. त्यामुळे यापुढील काळात नोंद झालेल्या मिळकतींचा यात समावेश नाही. सन २०१६ च्या नोंदीनुसार २ लाख १५ हजार ४०५ मिळकतींच्या कराची मागणी ९४ कोटी ५७ लाख २६ हजार ६५५ इतकी आहे. नव्या सर्वेक्षणानुसार अद्याप सर्वेक्षण व्हायच्या मिळकती व प्लॉट सोडून शहरात आढळलेल्या ८०,५३२ मिळकतीतून ८६ कोटी ८९ लाख ९४ हजार ८८४ तर हद्दवाढीतील ५७,६०५ मिळकतीतून ४९ कोटी ५५ लाख ९ हजार १८५ असे १३६ कोटी ४५ लाख ४ हजार ६९ रुपये इतका कर मिळणार आहे. जुन्या नोंदीतून ४१ कोटी ९७ लाख ९७ हजार ४१४ इतका कर वाढणार आहे. उर्वरित सर्वेक्षण पूर्ण झाल्यावर हा आकडा ५० कोटींच्यावर जाणार आहे.
-------------------------
सोलापूर पहिली महापालिका...........
जीआयएस सर्वेक्षणाद्वारे करआकारणी करणारी सोलापूर महापालिका ही राज्यात पहिली आहे. सर्वेक्षणातील २५ हजार मिळकतींची क्रॉस तपासणी केल्यावर २० टक्के चुका आढळल्या. त्यात मालक व भाडेकरूंना करआकारणी करणे व २०१४ नंतर नोंद झालेल्या मिळकतींची माहिती नाही. यासाठी करसंकलन विभागातील ६४ जणांचे पथक नियुक्त केले आहे. शनिवार व रविवारी हे पथक तपासणीसाठी शहरात फिरत आहे. त्यामुळे करसंकलनावर परिणाम झाल्याचे या विभागाचे प्रमुख आर. पी. गायकवाड यांनी सांगितले. १ एप्रिल ते २१ जूनअखेर ९ कोटी ७० लाख इतकी करवसुली झाली आहे.