नारायण पाटलांना सेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख द्या<bha>;</bha> झेडपी अध्यक्षांची मुख्यमंत्र्याकडे धाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 04:25 AM2021-01-16T04:25:29+5:302021-01-16T04:25:29+5:30
करमाळा : सोलापूर जिल्हा शिवसेनेची संघटनात्मक ताकद वाढविण्यासाठी करमाळयाचे शिवसेनेचे माजी आमदार नारायण पाटील यांची शिवसेना सोलापूर जिल्हा ...
करमाळा : सोलापूर जिल्हा शिवसेनेची संघटनात्मक ताकद वाढविण्यासाठी करमाळयाचे शिवसेनेचे माजी आमदार नारायण पाटील यांची शिवसेना सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुखपदी नियुक्ती करावी अशी मागणी सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरूध्द कांबळे व पंचायत समितीचे सभापती गहिनीनाथ ननवरे यांनी मंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.
याबाबत त्यांचे दौरे होत आहेत. माजी आमदार नारायण पाटील यांचा २०१९ च्या निवडणूकीत केवळ ३ हजार मतांनी पराभव झाला. करमाळा तालुक्यातील जिल्हापरिषद, पंचायत समिती, बाजार समिती या संस्था शिवसेनेच्या ताब्यात आहेत. सरपंच पदापासून ते आमदारकीचा प्रवास असल्याने ग्रामीण भागाची पुरेपूर माहिती त्यांना आहे. पैलवान क्षेत्रामध्ये सोलापूर जिल्ह्यातील सर्व ११ तालुक्यात गावा गावात त्यांचा मित्रवर्ग आहे. नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हापरिषद, पंचायत समिती या निवडणुकात फायदा होवू शकतो. सध्या सोलापूर जिल्हा शिवसेनेत गोंधळाचे वातावरण आहे. गटबाजी फोफावली आहे. यामुळे शिवसेनेचे संघटनात्मक मोठे नुकसान होत आहे.
तर गटबाजी थांबेल
संपूर्ण महाराष्ट्रात शिवसेनेत प्रवेश करण्यासाठी रांग लागली आहे तर दुसरीकडे सोलापूर जिल्हा शिवसेनेतून मात्र अनेक नेते गटबाजीला कंटाळून शिवसेना सोडून जात आहेत. जिल्ह्यातील शिवसेना मजबूत करण्याचे कौशल्य पाटील यांच्याकडे आहे. महेश कोठे, सेनेचे माजी मंत्री उत्तम प्रकाश खंदारे हे सुध्दा गटबाजीचे बळी ठरले आहेत. शिवसेनेत काम करणारे जुनी मंडळी प्रवाहाच्या बाहेर गेली आहे. विद्यमान संपर्कप्रमुख आ.तानाजी सावंत वर्षभरापासून जिल्ह्यात फिरकलेले नाही. या पार्श्वभूमीवर पाटील यांची जिल्हा संपर्कप्रमुखपदी नियुक्ती करावी, अशी मागणी होत आहे.
फोटो : नारायण पाटील