कौशल्य विकासाच्या कामाला प्रतिष्ठा मिळवून द्या; उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचे आवाहन

By Appasaheb.patil | Published: August 29, 2022 05:26 PM2022-08-29T17:26:06+5:302022-08-29T17:27:19+5:30

सोलापूर विद्यापीठातील कौशल्य विकासासाठी 10 कोटींच्या निधीचीही घोषणा पाटील यांनी केली.

Give prestige to skill development work; Appeal of Higher and Technical Education Minister Chandrakant Patil | कौशल्य विकासाच्या कामाला प्रतिष्ठा मिळवून द्या; उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचे आवाहन

कौशल्य विकासाच्या कामाला प्रतिष्ठा मिळवून द्या; उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचे आवाहन

googlenewsNext

सोलापूर : देशामध्ये बेरोजगारांच्या हाताला काम मिळावे, छोटे-मोठे व्यवसाय, धंदा करून रोजगार उपलब्ध व्हावा, यासाठी कौशल्य विकास विभागामार्फत त्यांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. प्रत्येक बेरोजगारांना शासकीय नोकरी मिळत नाही. बेरोजगार युवांनी कोणत्याही गोष्टीला कमी न मानता कौशल्य विकासचे प्रशिक्षण घेऊन रोजगाराभिमुख व्हावे. या कौशल्य विकासाच्या कामाला, नव्याने व्यवसाय करणाऱ्यांना प्रतिष्ठा मिळवून देण्याचे आवाहन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. 

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूरविद्यापीठ येथे कौशल्य विकास अभ्यासक्रमाचा पहिला दिक्षांत समारंभ, हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या जन्मदिनानिमित्त राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात पाटील बोलत होते. यावेळी माजी मंत्री आमदार सुभाष देशमुख, आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील, सचिन कल्याणशेट्टी, समाधान आवताडे, कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस, प्र.कुलगुरू व्ही.बी. पाटील, कुलसचिव सुरेश पवार आदींसह विद्यार्थी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

बाजाराची गरज ओळखून कौशल्याचे प्रशिक्षण आवश्यक
पाटील यांनी सांगितले की, राज्यात साडेबारा कोटी जनतेपैकी 20 लाख सरकारी नोकऱ्या आहेत. बाकी खाजगी क्षेत्र, व्यवसाय यामध्ये काम करतात. नोकरी करणाऱ्यांनी त्यांचे कौशल्य वाढविणे आवश्यक आहे. सध्या मुलांना शिक्षणासोबतच कौशल्य शिक्षण देणे काळाची गरज बनली आहे. प्रत्येक क्षेत्रातील बेरोजगारी घालविण्यासाठी कौशल्य विकासशिवाय पर्याय नाही. यामधील प्रशिक्षणही विकसित करून बाजाराची गरज ओळखून कौशल्याचे प्रशिक्षण निर्माण करण्याच्या सूचना त्यांनी केल्या. 

विद्यापीठाने व्यवसाय सुरू करणाऱ्यांना मदत करावी
विद्यापीठात 135 विविध प्रशिक्षण दिले जात आहे. यामुळे छोट्या गावातील युवकांनाही रोजगार मिळू लागला आहे. ही आनंदाची बाब आहे. विद्यापीठ फक्त प्रशिक्षण देणारे केंद्र बनू नये. नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी मदत करणे हा विद्यापीठाचा अविभाज्य भाग व्हावा, अशी सूचनाही त्यांनी केली.  

अहिल्यादेवींच्या स्मारकासाठी निधी कमी पडणार नाही
अहिल्यादेवी होळकर यांचे काम, त्यांची शौर्याची यशोगाथा, विकासाची हातोटी आणि आध्यात्मिक बैठक यामुळे त्यांचे नाव या विद्यापीठाला दिले आहे. या विद्यापीठाला नाव देऊन न थांबता 14 कोटींचा निधी दिला आहे. विद्यापीठ परिसरात होणाऱ्या अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकाला निधी कमी पडू देणार नाही, याची ग्वाही पाटील यांनी दिली. महात्मा बसवेश्वर अध्यासन केंद्राला 4 कोटींचा निधी देणार असल्याचेही त्यांनी सांगितले. 

विद्यापीठाच्या अंदाजपत्रकासाठी 54 कोटींचा निधी प्रस्तावानुसार मिळेल. कौशल्य विकासासाठी 10 कोटींच्या निधीचीही घोषणा पाटील यांनी केली. राज्याचा लौकिक क्रीडा प्रकारात वाढावा, चांगले खेळाडू तयार व्हावेत, यासाठी खेळाला प्राधान्य देण्यात येत आहे. सोलापूर विद्यापीठाने खेळाचा सर्वंकष आराखडा तयार करावा. खेळाच्या साहित्यासाठी सीएसआर फंडातून मदत मिळवून देण्याची ग्वाही त्यांनी दिली. पाटील यांच्या हस्ते कौशल्य विकास विभागाच्या संगणक प्रणालीचे कळ दाबून उद्घाटन करण्यात आले. 

प्रास्ताविकात डॉ. फडणवीस यांनी विद्यापीठाने उद्यमशिलतेसाठी तीन वर्षात 14 पेटंट मिळविल्याचे सांगितले. अहिल्यादेवी होळकर यांचे कार्य समाजासाठी दिशादर्शक असून त्यांच्या कार्याचे संशोधन विद्यापीठात होत आहे. यासोबतच विद्यापीठ राबवित असलेले उपक्रम, शैक्षणिक धोरण, विविध प्रशिक्षण, युके देशाकडून मिळालेला सन्मान याविषयी माहिती दिली. 

यावेळी बार्शीच्या काजल भाकरे आणि कामिनी भोसले यांनी पॉवर लिफ्टिंगमध्ये प्राविण्य मिळविल्याने आणि संघव्यवस्थापकांचा सन्मान करण्यात आला. विविध प्रशिक्षणात प्रथम आलेले- सायली धुमाळ, लावण्या सुंचू, शितल घोडके, विद्या गायकवाड, विजयंता पाटील, राजेंद्र शिंदे, पूर्वा बारबोले, ऐश्वर्या देवकते, ललिता धिमधिमे, नागराज खराडे, अर्जुन धोत्रे, अनुराधा बोधनकर, अमृता सूत्रावे, दीपक भडकवाड, अमोल व सारिका वेल्हाळ, स्नेहल कोल्हाळ. रूपाली बनकर, दत्तात्रय इंगळे, विनोद मोहिते, पल्लवी देवकर, करूणा उकिरडे, शुभांगी साळुंखे, ऐश्वर्या गायकवाड, अश्विनी काबरे, श्रीहरी बीकुमार  या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. 

गुणवंत पाल्य म्हणून श्रीनिवास कुलकर्णी आणि गौरी कुलकर्णी यांचा सन्मान झाला. नियतकालिका स्पर्धेमध्ये दयानंद कॉलेज, सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय, कोर्टी, वालचंद कला व शास्त्र महाविद्यालय आणि वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालय यांचाही सन्मान करण्यात आला.  
कौशल्य विकासातून रोजगार मिळालेल्या दोन विद्यार्थ्यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले. आभार सुरेश पवार यांनी मानले.

Web Title: Give prestige to skill development work; Appeal of Higher and Technical Education Minister Chandrakant Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.