शेतकऱ्यांना प्राधान्याने लस द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:17 AM2021-05-29T04:17:55+5:302021-05-29T04:17:55+5:30
कुर्डूवाडी : शेतात समूहाने काम करणाऱ्या शेतकरी वर्गाबरोबरच उद्योग क्षेत्रातील व कारखान्यातील कर्मचारी वर्गालाही प्राधान्याने कोरोना लस देण्यात यावी, ...
कुर्डूवाडी : शेतात समूहाने काम करणाऱ्या शेतकरी वर्गाबरोबरच उद्योग क्षेत्रातील व कारखान्यातील कर्मचारी वर्गालाही प्राधान्याने कोरोना लस देण्यात यावी, अशी मागणी कुर्डूवाडी पंचायत समितीचे सभापती विक्रमसिंह शिंदे यांनी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्याकडे केली आहे.
जिल्ह्यातील जिल्हा परिषद, पंचायत समितीचे सदस्य व सभापतींची जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्यासमवेत एक बैठक घेण्यात आली. यावेळी सभापती विक्रमसिंह शिंदे यांनी या विविध मागण्या केल्या आहेत.
जिल्हाधिकाऱ्यांच्या ऑनलाईन बैठकीत सभापती विक्रम शिंदे यांनी कारखान्यांमध्ये समूहाने काम करणारे, शेतीमध्ये काम करणारे व उद्योग क्षेत्रातील कामगारांना लवकर लस दिली, तर कोरोना संसर्ग खूप कमी होईल असे सांगितले. यावेळी त्यांनी माढा तालुक्यात ग्रामीण रुग्णालयांमध्ये कर्मचाऱ्यांची संख्या कमी असून, तात्पुरत्या स्वरूपात त्वरित कर्मचारी भरती करण्यात यावी अशीही मागणी केली. पुणे जिल्ह्यामध्ये गावागावांत व गल्लीमध्ये लसीकरण मोहीम पार पडत आहे. तशीच आपल्याकडेही सुरू करावी, असे सुचविले आहे.
---
होम क्वारंटाईन होऊ नका
भविष्यात तिसरी लाट येणार असल्याचे बोलले जात असून, यामध्ये लहान मुलांना कोरोनाची लागण होण्याची शक्यता असल्याचे सांगितले जात आहे. या पार्श्वभूमीवर माढा तालुक्यातील गावोगावी जाऊन लहान मुलांचे सर्वेक्षण करावे. यासाठीचे अधिकारी, कर्मचाऱ्यांना काम सुरू करण्याचे आदेश द्यावेत, अशीही यावेळी मागणी केली. त्याचबरोबर तालुक्यामध्ये सध्या ८०० बेड कोविड केअर सेंटरमध्ये तयार करण्यात आले आहेत. त्यामुळे कोणीही होम क्वारंटाईन न होता सेंटरमध्ये उपचार घ्यावेत. त्यासाठी प्रत्येक गावातील तलाठी, ग्रामसेवक, गावपातळीवरील कर्मचारी, ग्राम समितींना सूचना देऊन नागरिकांना त्या ठिकाणी उपचारास पाठविण्याचे नियोजन करावे या विविध मागण्या सभापती विक्रमसिंह शिंदे यांनी केल्या आहेत.
..................
फोटो- सभापती विक्रमसिंह शिंदे