कुत्र्याला मारल्याचा योग्य तो पुरावा द्या, तब्बल २५ हजार रुपये बक्षीस मिळवा; बक्षिसाची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2024 12:45 PM2024-12-09T12:45:01+5:302024-12-09T12:51:19+5:30
माहिती देणाऱ्या व्यक्तीस २५ हजार रुपये देण्यात येणार आहेत. निष्पाप प्राण्यांना न्याय मिळवून देण्यासाठी मदत करण्याचे आवाहन केले आहे.
सोलापूर : अक्कलकोटमध्ये २९ नोव्हेंबर रोजी २२ तासांत १२ भटक्या कुत्र्यांचा मृत्यू झाला. या कुत्र्यांना मारल्याचा पुरावा देणाऱ्यास पीएएल अॅनिमल फाउंडेशन संघटनेकडून २५ हजार रुपये बक्षीस म्हणून देण्यात येणार आहेत. आशितोष चंद्रकांत कटारे (वय ३३) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे.
२९ नोव्हेंबर रोजी रात्री ११ ते ३० नोव्हेंबर रोजी रात्री ९ वाजेपर्यंत शहरातील १० ते १२ कुत्रे अज्ञात व्यक्तीने खाद्यपदार्थ देऊन मारले. एका कुत्र्याचा मृतदेह कामगार चौकात होता. इतर कुत्र्यांच्या मृतदेहावर अज्ञात व्यक्तीने अंत्यसंस्कार केले असल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. त्या अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शनिवार ३० नोव्हेंबर रोजी शहरातील कारंजा चौक, मुजावर गल्ली, जुना आडत बाजार, फुटाणे गल्ली, विजय कामगार चौक याठिकाणी देखील भटके कुत्रे मरून पडल्याचे कटारे यांना दिसून आले. अक्कलकोट येथे १२ कुत्र्यांच्या मृत्यूची दखल मुंबईतील पीएएल अॅनिमल फाउंडेशन वेल्फेअर संघटनेने घेतली आहे. या प्रकरणी जे दोषी असतील त्यांच्यावर कडक कारवाई व्हावी यासाठी पुराव्यांची गरज आहे. त्यामुळे याबाबत माहिती देणाऱ्या व्यक्तीस २५ हजार रुपये देण्यात येणार आहेत. निष्पाप प्राण्यांना न्याय मिळवून देण्यासाठी मदत करण्याचे आवाहन केले आहे.
आधी ११ हजार नंतर वाढवली रक्कम
माहिती देणाऱ्या व्यक्तीस ३ डिसेंबर रोजी ११ हजार रुपये देण्याचे जाहीर केले होते. आता संस्थेकडून योग्य माहिती व पुरावा देणाऱ्यास २५ हजार रुपये देण्याची घोषणा केली आहे. संस्थेकडून जाहीर केलेल्या बक्षिसाची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.