सात जणांवर काळाचा घाला
By admin | Published: June 21, 2014 12:55 AM2014-06-21T00:55:49+5:302014-06-21T00:55:49+5:30
सिमेंटचे कठडे ढासळले: वाढेगाव परिसरात शोककळा
वाढेगाव (ता. सांगोला): तालुक्यातील वाढेगाव येथे विहिरीचे खोदकाम सुरु असताना अचानक सिमेंटचे संरक्षक कठडे ढासळून सात शेतमजूर विहिरीमध्ये गाडले गेले. ही घटना वाढेगाव-सावे रस्त्यावरील विहिरीत शुक्रवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास घडली. या सात जणांवर काळाने घाला घातल्यामुळे सांगोल्यासह वाढेगाव परिसरात शोककळा पसरली आहे.
संतोष मारुती रोडगे (३२), अंकुश मारुती रोडगे (३१), नामदेव केराप्पा डोईफोडे (२२), दादा बापूसाहेब हजारे (२७), दत्तात्रय आनंदा हजारे (२२), ज्ञानू हणमंत हजारे (३७, सर्व रा. वाढेगाव) व विलास मोहन इंगवले (२७, रा. कोपटे वस्ती, सांगोला) हे सर्व विहिरीमध्ये गाडले गेले, तर तानाजी महादेव रोडगे व बिरा लक्ष्मण डोईफोडे हे दोघे बचावले आहेत.
वाढेगाव-सावे रस्त्यावरील पवार वस्तीशेजारी माण नदीपात्रात मधुकर दिघे यांच्या विहिरीचे खोदकाम गेल्या दीड महिन्यापासून सुरू आहे. या विहिरीचे काम जवळपास ३५ ते ४० फूट खोल गेले होते. त्यावर सिमेंटची गोलाकार रिंग बांधली होती. विहिरीमधून ४० फूट खोलीवरून क्रेनच्या साहाय्याने मजुरांकडून गाळ काढण्याचे काम सुरु होते. नव्याने टाकलेल्या रिंगमुळे खाली तडे जाऊन खचल्याने विहिरीशेजारील वाळू व मातीचा भरावा ढासळला. तळामध्ये गाळ भरणारे ६ मजूर व क्रेनचालकासह सात जण विहिरीमध्ये गाडले गेले.
या घटनेचे वृत्त समजताच तहसीलदार श्रीकांत पाटील, प्रांताधिकारी श्रावण क्षीरसागर, पो. नि. अजय कदम, ए. पी. आय. ज्ञानेश्वर करचे यांनी घटनास्थळी धाव घेतली. रिंगमधील वाळू काढण्यासाठी दोन पोकलेन, पाच जेसीबी, ट्रॅक्टर, टिप्पर, रुग्णवाहिका, अग्निशामक दल यांच्या सहाय्याने युद्धपातळीवर कामाला सुरुवात केली.
यावेळी आ. गणपतराव देशमुख, आ. दीपक साळुंखे, शेतकरी संघटनेचे सदाभाऊ खोत आदींनी भेट देऊन आपद्ग्रस्तांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत दोन मृतदेह काढण्यात प्रशासनाला यश आले असून रात्री उशिरापर्यंत इतर गाडलेल्या मजुरांना काढण्याचे काम सुरु होते. ही माहिती समजताच घटनास्थळी मजुरांच्या कुटुंबीयांनी एकच आक्रोश मांडला होता.
-------------------------
हंबरडा आणि आक्रोश
विहिरीमध्ये गाडलेल्या मजुरांमध्ये अंकुश रोडगे व संतोष रोडगे हे सख्खे भाऊ तर दादा हजारे हा कुटुंबातील एकुलता एक मुलगा. दत्तात्रय हजारे व ज्ञानू हजारे हे चुलता पुतणे आहेत. त्यांच्या नातेवाईकांनी घटना समजताच विहिरीजवळ एकच हंबरडा फोडला होता.
दोघे बचावले
या घटनेमधील अंकुश रोडगे हा विहिरीच्या कामाला अधिक मजुरी असल्याने आजच विहिरीचे काम करण्यासाठी आला होता; मात्र तो घरी परतू शकला नाही. बिरा लक्ष्मण डोईफोडे व तानाजी महादेव हे दोघे विहिरीवरील कठडा ढासळताना प्रसंगावधान राखून क्रेन पकडल्याने बचावले.
परिसरातील दुसरी घटना
१९९४ साली त्याच परिसरात अशाच पद्धतीची घटना घडून रिंगमधील वाळू काढत असताना सावे येथील एक शेतकरी वाळूमध्ये गाडला गेला होता. तो अथक प्रयत्न करूनही सापडला नव्हता.