ग्लोबल टिचर रणजित डिसले गुरुजी राजीनामा परत घेणार; सीईंओशी साधला संवाद
By शीतलकुमार कांबळे | Published: July 20, 2022 02:41 PM2022-07-20T14:41:25+5:302022-07-20T14:41:32+5:30
मात्र गुरुजींचे मौन: कारवाई अन् राजीनाम्यावर चर्चा
सोलापूर : ग्लोबल टीचर रणजितसिंह डिसले यांनी जिल्हा परिषदेचे सीईओ दिलीप स्वामी यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी दिलेला राजीनामा व कारवाई याबद्दल चर्चा झाली. मात्र, यावर बोलण्यास डिसले गुरुजी यांनी नकार दिला. लवकरच डिसले गुरूजी राजीनामा मागे घेणार असल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
डिसले गुरुजींनी राजीनामा दिल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. या भेटीत त्यांनी आपली कैफियत मांडली. या भेटीनंतर मुख्यमंत्री यांनी डिसले गुरुजींना त्रास होऊ नये, याबाबतच्या सूचना प्रसार माध्यमांसमोर दिल्या होत्या. त्यानंतर जिल्हा परिषद प्रशासनही सावध भूमिका घेताना दिसत आहे. डिसले गुरुजींनी ८ जुलै रोजी शिक्षक पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर त्यांनी मुंबईला जाऊन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी पुणे येथे शिक्षण आयुक्तांसोबत चर्चा केल्याचे सांगितले जात आहे.
बैठकीत काय झाले, यावर डिसले गुरुजींनी मौन बाळगले. जिल्हा परिषदेकडून विद्यार्थ्यांसाठी दशसूत्री कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. याबाबत बैठकीला आल्याचे त्यांनी सांगितले. या बैठकीत सीईओ दिलीप स्वामी, उपशिक्षणाधिकारी संजय जावीर आदी उपस्थित होते.
डिसले गुरुजी अनुपस्थित असल्याबद्दलचा चौकशी अहवाल प्रसिद्ध झाला. या अहवालात ते दोषी असल्याचे नमूद करण्यात आले होते. त्यामुळे आता डिसले गुरुजी यांच्यावर कारवाई होणार, अशी चर्चा सुरु होती. मात्र, मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर पुन्हा डिसले गुरुजी, सीईओ आणि उपशिक्षणाधिकारी यांच्यात चर्चा झाली.