सरळ स्ट्रेट जाऊन उजवीकडे राईटला वळा़ !
By admin | Published: July 22, 2016 07:46 PM2016-07-22T19:46:48+5:302016-07-22T19:46:48+5:30
हल्ली तरुणाईच्या मुखी अनेक नवे ट्रेंड रुढ होऊ पाहत आहेत. अनेक कोडवर्ड भाषांमुळे अनेकांची पंचाईत होते. काही समजत नाही. सहज तरुणाईचा घोळका थांबला असेल आणि एखाद्या
- विलास जळकोटकर
सोलापूर, दि. 22 - हल्ली तरुणाईच्या मुखी अनेक नवे ट्रेंड रुढ होऊ पाहत आहेत. अनेक कोडवर्ड भाषांमुळे अनेकांची पंचाईत होते. काही समजत नाही. सहज तरुणाईचा घोळका थांबला असेल आणि एखाद्या अनोळखीने पत्ता विचारला तर त्याला हमखास उत्तर मिळतं ते कसं पाहा.. हे बघा, सरळ स्ट्रेट जाऊन उजवीकडे राईटला वळा... मंडळी इंग्रजी-मराठी शब्दांची भेळमिसळ करताना आपण भाषेची पुरती वाट तर लावतोच याचे भान राहत नाही पण यात आपलंही हसं होतं. या विषयाच्या अनुषंगाने अनेकांशी संवाद साधताना त्यांनी प्रांजळ कबुली देत सुधारण्याची अपेक्षा व्यक्त केली.
दोन्ही किंबहुना अनेक भाषांतील शब्दांचा वापर करुन बोलण्याची लकब तशी महाराष्ट्रात कोठेही जा ऐकायला मिळेल. फक्त त्या त्या परिसराची त्याला जोड दिलेली असते. सोलापूर शहर तसं सीमावर्ती भागाशी जोडलेलं असल्यानं इथं अनेक भाषांचा संगम झाल्याचं दिसून येतं. अख्ख्या महाराष्ट्रात विखुरल्या गेलेल्या बहुतांश भाषा बोलण्याने मंडळी इथं गुण्यागोविंदाने नांदतात. साहजिकच यामुळे अगदी मराठी, कानडी, तेलुगू मध्येच इंग्रजी अशा भाषा एकाचवेळी त्यांच्या बोलण्यातून जाणवतात. यातून अनेकदा जाणकार मराठी भाषिक शब्दप्रभूंचा मात्र गोंधळ उडतो. अनेकदा त्यांना काही समजत नाही. पण जो बोलणारा आणि ऐकणारा आहे त्याला मात्र ते हमखास समजते. सोलापुरात जी खासियात आहे ती अन्य ठिकाणी सारखीच असेल असे नाही, मात्र तेथील लकबीनुसार त्याला वेगळी परिभाषा तरुणाईत आढळत आहे.
सोलापुरी मिक्स मजेशीर परिभाषा
बहुभाषिक सोलापुरात एकाच अर्थाचे दोन भाषांमधील शब्द एकाच वाक्यात बोलण्याची भाषा स्टाईल प्रचलित आहे. त्यातले काही वाक्य पाहा. ते दुकान खाली बेसमेंटला आहे, मुलींची कन्या प्रशाला, मोठा बिग बाजार, त्यामागच बॅकग्राऊंड, मी त्यांच्या अंडरखाली खाली काम करतो, ओव्हरआॅल सर्व, आताच जस्ट आलो, तुझ्या केसाची हेअरस्टाईल लई भारी हाय बे, ठंका कोल्ड ड्रिंक द्या, मैदानाला गोल राऊंड मारुन आलो, इस्त्री दाबून प्रेस करा, कचरा खाली बॉटमला टाका अशा अनेक समानार्थी शब्द बोलण्याची जणू तरुणाईमध्ये फॅशन बनली आहे. यात भाषेचे मात्र तीन तेरा होतात याकडे कोणाला देणंघेणं नसतं.