गोव्याचे मुख्यमंत्री सोलापुरात; भाजपासह राष्ट्रवादी, शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना भेटणार
By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2023 11:42 AM2023-02-22T11:42:41+5:302023-02-22T11:43:04+5:30
दरम्यान, आज दिवसभर सावंत हे सोलापूर, अक्कलकोट, माढा, मोहोळ, पंढरपूरला भेटी देणार आहेत.
आप्पासाहेब पाटील
सोलापूर : गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे आजपासून दोन दिवस सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. आज बुधवार २२ फेब्रुवारी २०२३ रोजी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास त्यांचे विमानतळावर आगमन झाले. प्रारंभी सोलापूर विमानतळावर आ. सुभाष देशमुख, पोलीस आयुक्त राजेंद्र माने यांनी त्यांचे स्वागत केले.
दरम्यान, आज दिवसभर सावंत हे सोलापूर, अक्कलकोट, माढा, मोहोळ, पंढरपूरला भेटी देणार आहेत. या भेटीत ते राष्ट्रवादीचे माजी आमदार राजन पाटील, भाजपाचे आमदार सुभाष देशमुख, आ. सचिन कल्याणशेट्टी यांच्या निवासस्थानी भेट देणार आहेत. शिवाय शिवसेनेच्या संपर्क कार्यालयास ते भेट देऊन शिवसेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त यांच्या भेटी घेणार आहेत.
असा आहे त्यांचा दोन दिवसाचा दौरा...
२२ फेब्रुवारी २०२३ रोजी सकाळी ११.३० वाजता तुळजापूर येथे तुळजाभवानी मातेचे दर्शन घेणार आहेत. दुपारी १२ वाजता अनगर (ता. मोहोळ) येथे माजी आमदार राजन पाटील यांच्या घरी भेट देणार आहेत. त्यानंतर दुपारी १ वाजता माढा येथील एका कार्यक्रमाला ते उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रम संपल्यानंतर दुपारी तीनच्या सुमारास पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रूक्मिणी मंदिराला भेट देऊन देवदर्शन करणार आहेत. तेथून ते परत माढा येथील एका कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. सायंकाळी पाच वाजता शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या भेटीगाठी, रात्री ७ वाजता अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेणार आहेत. त्यानंतर आ. सचिन कल्याणशेट्टी यांच्या घरी ते रात्रीचे जेवण करणार आहेत. तेथून ते सोलापुरात येऊन मुक्काम करणार आहेत.
२३ फेब्रुवारी २०२३ रोजी सकाळी ९ वाजता सोलापूर विमानतळाहून कोल्हापूरकडे जाणार आहेत. साडेनऊ वाजता कोल्हापूर येथील श्री. महालक्ष्मी मातेचे दर्शन घेणार आहेत. त्यानंतर टेंबळाईवाडी, कनेरी मठातील येथील सिध्देश्वर मंदीरात दर्शन घेऊन ते कोल्हापूर विमानतळाहून गोव्याकडे प्रयाण करणार आहेत.