सोलापुरात २०२२ पर्यंत २ हजार गारमेंटस् युनिटस् सुरू करण्याचे लक्ष्य, २७ जानेवारीपासून आंतरराष्टÑीय वस्त्रप्रदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2018 05:33 PM2018-01-23T17:33:15+5:302018-01-23T17:35:50+5:30
काहीशा असंघटीत स्वरूपात असलेला येथील गणवेशनिर्मिती आणि गारमेंट उद्योग आता संघटीत होण्याच्या मार्गावर असून, सन २०२२ पर्यंत शहरात २ हजार नवीन गारमेंट आणि रेडीमेड कपड्याचे युनिटस् उभारण्याचे लक्ष्य निश्चित करण्यात आले आहे.
रवींद्र देशमुख
सोलापूर दि २३ : काहीशा असंघटीत स्वरूपात असलेला येथील गणवेशनिर्मिती आणि गारमेंट उद्योग आता संघटीत होण्याच्या मार्गावर असून, सन २०२२ पर्यंत शहरात २ हजार नवीन गारमेंट आणि रेडीमेड कपड्याचे युनिटस् उभारण्याचे लक्ष्य निश्चित करण्यात आले आहे. सोलापूर रेडीमेड कापड उत्पादक संघाच्या या प्रयत्नाला राज्य सरकारने प्रोत्साहन दिले आहे. त्याचाच एक भाग म्हणून येत्या २७ जानेवारीपासून आंतरराष्टÑीय गणवेश व वस्त्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.
दोन दिवसांच्या या प्रदर्शनातील सहभागासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जगभरातील दूतावासांना निमंत्रण दिले आहे. या प्रदर्शनामुळे सोलापूरला देशातील गारमेंट व गणवेश हब करण्याच्या प्रयत्नांना गती मिळेल, असा विश्वास रेडीमेड कापड उत्पादक संघाचे अध्यक्ष रामवल्लभ जाजू यांनी आज ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला.
सोलापुरात सध्या ५०० गणवेश युनिटस् कार्यरत आहेत. उत्तम शिलाई, कमी दर आणि तत्काळ उपलब्धता, या वैशिष्टयांमुळे येथील या उद्योगाने लौकिक प्राप्त केला आहे. गणवेश उद्योगातील बँडेड कंपन्या सोलापुरातील या युनिटस्ची संपर्क साधून काम करून घेत आहेत; पण असंघटीतपणामुळे उद्योगाचे व्यापक स्वरूप येथील गणवेश व्यवसायाला आले नाही. रेडीमेड कापड उत्पादक संघ मात्र आता गारमेंटस्, गणवेश व्यवसायाला उद्योगाचे स्वरूप देण्यासाठी पावले उचलत आहेत.
सध्या सुरू असलेल्या गारमेंट युनिटस्ना आणि भविष्यात सुरू होणाºया युनिटस्ना कुशल कामगार उपलब्ध करून देण्यासाठी आजवर तीनशे महिलांना प्रशिक्षण देण्यात आले आहे, असे जाजू यांनी सांगितले. येथे टेक्स्टाईल्सचे ५०० कारखानदार आहेत. सुमारे पंचेवीस हजार कामगार या उद्योगावर अवलंबून आहेत; पण सध्या चादर आणि टॉवेल उत्पादनाचा हा उद्योग विविध कारणांमुळे अडचणीत सापडला आहे. या स्थितीत नव्याने व्यापक स्वरूप धारण करणाºया गणवेश, गारमेंट उद्योग सोलापूरच्या रोजगार निर्मिती व अर्थकारणावर सकारात्मक परिणाम करणारा ठरेल, अशी आशा व्यक्त होत आहे.
--------------------------
वस्त्र प्रदर्शनाविषयी
- या आंतरराष्टÑीय प्रदर्शनामध्ये शालेय उपयोगातील वस्तू पाहायला मिळतील. यामध्ये बॅगा, बेल्टस्, टॉईज्, याशिवाय प्रवासी बॅगांचाही समावेश आहे.
- देशभरातील कंपन्यांचे गणवेश
- वस्त्रोद्योगासंदर्भातील नवीन तंत्रज्ञानही येथे उपलब्ध करण्यात येणार आहे.
- १४ राज्यातील रिटेलर,डिलर्स आणि वितरकांना निमंत्रण
- १९८ भारतीय दूतावास आणि १६४ भारतातील दूतावासांना निमंत्रण