शेळ्या राखणाऱ्या मुलीवर अत्याचार, मुलगी गर्भवती; आरोपीस अटक; लैंगिक छळाचा गुन्हा
By विलास जळकोटकर | Published: October 24, 2023 02:24 PM2023-10-24T14:24:29+5:302023-10-24T14:26:48+5:30
शेतात शेळ्या राखण्यासाठी येणाऱ्या साडेचौदा वर्षाच्या अल्पवयीन मुलीला पैसे देण्याचं आमिष दाखवून तिच्यावर वारंवार अत्याचार केले.
विलास जळकोटकर
सोलापूर : शेतात शेळ्या राखण्यासाठी येणाऱ्या साडेचौदा वर्षाच्या अल्पवयीन मुलीला पैसे देण्याचं आमिष दाखवून तिच्यावर वारंवार अत्याचार केले. कोणाला सांगितले तर तुझ्या वडिलाला मारुन टाकतो अशी धमकी दिली. रुग्णालयात तपासणी केली असता ती गर्भवती असल्याचे उघडकीस आले. हा प्रकार एप्रिल ते मे २०२३ या कालावधीत शहराजवळील एका गावात घडल्याचे बुधवारी उघडकीस आले. या प्रकरणी कल्लप्पा उर्फ रंगा कामते (वय- ४९) याच्याविरुद्ध भा.दं. ३७६, बाललैंगिक छळाचा गुन्हा नोंदवून अटक केली आहे.
पिडितेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, शहरानजीकच्या एका गावात १४ वर्ष सात महिने वयाची पिडिता आपल्या कुटुंबासमवेत राहते. मोलमजुरी करुन हे कुटुंब आपली गुजराण करते. मुलीने दीड वर्षांपूर्वी ९ वीतून शाळा सोडली असल्याने ती शेळ्या राखण्याचे काम करते.
एप्रिल २०२३ च्या काळात शेळ्या राखण्यासाठी ती गेली असताना आरोपीची ओळख झाली. ती त्याला मामा म्हणून हाका मारायची. सुरुवातीला तोही मुलीसारखे बोलायचा. एकेदिवस त्याने पैसे देण्याचे आमिष दाखवून तिला दुपारच्यावेळी शेतात नेऊन जबरदस्तीने अत्याचार केले. कोणाला सांगितले तर तुझ्या वडिलाला मारुन टाकेन अशी धमकी दिली. मे महिन्यापर्यंत तो वारंवार धमकी देऊन अत्याचार करायचा.
मे महिन्यापासून मासिक पाळी न आल्याने पिडितेच्या आईने तिला शासकीय रुग्णालयात तपासणीसाठी नेले असता ती २० आठवड्याची गर्भवती असल्याचे सांगण्यात आले.
आई वडिलांनी विचारणा करता पिडितेने केलेल्या कृत्याबद्ल आणि धमकी दिल्याबद्दल सांगितले. विजापूर नाका पोलिसांनी पिडितेचा जबाब नोंदवून आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदवून मंगळवारी रात्री अटक करण्यात आली आहे. सध्या पिडितेवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तपास सपोनि जाधव करीत आहेत.