वाखरीत बिबट्याकडून शेळ्यांची शिकार; आरडाओरडा करताच फरार...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2018 12:51 PM2018-12-01T12:51:14+5:302018-12-01T12:53:23+5:30
गार्डी अन् भाळवणीत मुक्काम : शिवारात शाळकरी मुलीने पाहिला थरार
पंढरपूर : गेल्या २५ दिवसांपासून वाखरी येथे मुक्काम करीत असलेल्या बिबट्याने आता त्याचा मुक्काम बदलला असून तो भाळवणी येथे पोहोचला आहे.
वाखरी ( ता. पंढरपूर) येथील लक्ष्मणदास महाराज माथा जवळील विकास गायकवाड यांच्या शेतामध्ये बिबट्या अनेक दिवसांपासून वावरत होता. यामुळे विकास गायकवाड यांची शेतातील कामे अपूर्ण राहिली़ बिबट्याचा वावर असल्याने भीतीपोटी त्यांनी यंत्राद्वारे उसाची तोडणी केली. यामुळे त्या परिसरातून बिबट्याने आपला मुक्काम वाखरीतच मात्र राऊत वस्तीकडे केला होता. त्या परिसरात माणसांचा जादा वावर असल्याने बिबट्याने रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत भाळवणीत शेळ्यांची शिकार केली, परंतु पुन्हा गुरुवारी रात्री गार्डी येथे शेळीची शिकार केली आहे.
याबाबतची माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी विशाल पोवळे यांनी तत्काळ त्या ठिकाणी कर्मचाºयांना पाठवून संबंधित घटनेचा पंचनामा केला. तसेच गटविकास अधिकारी रविकिरण घोडके यांनी देखील भाळवणी गावाला भेट देऊन वन विभागाच्या कर्मचाºयांना सूचना दिल्या आहेत.
तसेच भाळवणी येथे एका कुत्र्यावर बिबट्या हल्ला करताना शाळकरी मुलीने पाहिले आहे. मुलीने तत्काळ आरडाओरडा करताच बिबट्या पुन्हा शेतामध्ये निघून गेला. त्यामुळे वन विभागाच्या अधिकाºयांनादेखील नेमके कोणत्या गावात कोणत्या ठिकाणी कार्यवाही करावी याचा अंदाज येईनासा झाला आहे.
ग्रामस्थांमध्ये भीती
बिबट्याच्या उच्छादामुळे जिल्ह्यात भीतीचे वातावरण पसरले असून, जिल्ह्याच्या सीमेवर आलेला हा हिंस्त्र प्राणी आता पंढरपूर तालुक्यातील गावात घुसला आहे. त्यामुळे ग्रामस्थ खबरदारी बाळगूनच रात्री उशीरा बाहेर पडतात. बिबट्या दिसला तर काय करावे, याबाबत वनविभागाने वाखरी येथे बैठक घेऊन ग्रामस्थांना मार्गदर्शन केले असले तरी त्यांच्यामधील भीती कायम आहे. जिल्ह्यात ऊस शेती आणि पाण्याची मुबलकता असल्यामुळेच बिबट्या इकडे वावरत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.