खाकीत देव आला धावून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2021 04:21 AM2021-03-28T04:21:50+5:302021-03-28T04:21:50+5:30
कामती : देवाचे दुसरे रूप म्हणून आपण डॉक्टरकडे पाहतो. डॉक्टरांमुळे दवाखान्यातील रुग्णाला जीवनदान मिळते. परंतु या डॉक्टर देवाला वाचवण्यासाठी ...
कामती : देवाचे दुसरे रूप म्हणून आपण डॉक्टरकडे पाहतो. डॉक्टरांमुळे दवाखान्यातील रुग्णाला जीवनदान मिळते. परंतु या डॉक्टर देवाला वाचवण्यासाठी देवरूपी पोलिसांची मदत झाली. पोलिसांच्या मदतीने एका डॉक्टरला वाचवण्यात यश आले आहे. पोलिसांच्या माणुसकीचे उदाहरण सोलापूर- मंगळवेढा रस्त्यावर बेगमपूरजवळ झालेल्या अपघातप्रसंगी पाहायला मिळाला.
त्याचे झाले असे...डॉ. संघमित्रा मेळकोंडे (वय ४०, रा. बिदर, कर्नाटक) हे २६ मार्च रोजी कारमधून कोल्हापूरहून बिदरला निघाले होते. दुपारी दोन वाजता सोलापूर- मंगळवेढा रस्त्यावर बेगमपूर जवळ येताच त्यांचा गाडीवरील ताबा सुटला अन् गाडी रस्त्यावरून उलटली. या अपघात त्यांना मोठी इजा झाली. ते बेशुद्धावस्थेत रस्त्याच्या कडेला पडले होते.
कामती पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक सचिन जाधवर यांना हा अपघात समजला तेव्हा त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघाताच्या ठिकाणी डॉ. संघमित्रा हे उन्हात बेशुद्धावस्थेत पडलेले दिसले. उन्हाळ्याचे दिवस असल्याने उन्हाचा तडाखा होता. हे पाहून त्यांनी स्वतः सतरंजी आणून सावली निर्माण केली. दरम्यान ॲम्ब्युलन्सला यायला एक तास लागला. तोपर्यंत पोलीस कॉन्स्टेबल अमोल पाटील, पोलीस नाईक सचिन जाधवर आणि होमगार्ड वाघमोडे यांनी त्यांच्याशी संवाद साधत त्यांना येथून रुग्णालयात हलवण्यासाठी प्रयत्न केले.
त्या 'देवरूपी' पोलिसांच्या कार्यामुळे एका डॉक्टरांचा जीव वाचला. त्यांच्या या कार्याबद्दल कामती पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश माने यांनी सर्वांचे कौतुक केले.
---
कठोर मनाचे पोलीस मनाने मृदू झाले
पोलीस म्हटलं की सर्वसामान्यांच्या मनात उभी राहते. ती खाकी वर्दीतील तापट स्वभावाची, कडक शब्दात बोलणारी, हेकेखोर, असंवेदनशील व्यक्तीची प्रतिमा पाहिली की कोणीच पोलीस ठाण्याची पायरी चढायला नको म्हणतो. त्यामुळे अनेकांच्या मनात पोलिसांबद्दल भीती असते. असा हा पोलीस कर्तव्याच्या वेळी जितका कठोर असतो तितकाच वेळप्रसंगी मनानेही मृदू होतो, याचा प्रत्यय या अपघाताने आणून दिला आहे.
---
फोटो ; २७ कामती
अपघातातील जखमी डॉक्टरला सावली देणारे कामती पोलीस स्टेशनचे नाईक सचिन जाधवर, अमोल पाटील व होमगार्ड वाघमोडे