मराठा आरक्षणासाठी मंदिरासमोर भजन करीत बाल वारकऱ्यांनी घातले विठुरायाला साकडे
By दिपक दुपारगुडे | Published: November 1, 2023 06:56 PM2023-11-01T18:56:43+5:302023-11-01T18:56:54+5:30
सकल मराठा समाजाला कुणबी मराठा आरक्षण मिळावे, यासाठी पंढरपूर तालुक्यातील देगाव, चळे, आंबे, मुंढेवाडी, पुळूज परिसरात साखळी उपोषण करण्यात येत आहे.
सोलापूर : मराठा आरक्षणासाठी विविध प्रकारची आंदोलने सुरू असताना बुधवारी राज्यभरातून वारकरी शिक्षण घेण्यासाठी पंढरपूरमध्ये असलेले शेकडो बाल वारकऱ्यांनी विठ्ठल-रुक्मिणी मंदिर परिसरात भजन, कीर्तन करून मराठा आरक्षणासाठी विठुरायाला साकडे घातले आहे. बाल वारकरी विठ्ठलाला साकडे घालण्यासाठी नामदेव पायरी येथे जमले होते. ज्ञानेश्वर महाराज जोगदंड यांच्याकडे शिक्षण घेणारे हे गोरगरीब मराठा समाजाच्या मुलांनी ज्ञानोबा तुकाराम जयघोष करीत मंदिर परिसर दुमदुमून सोडला. आम्हाला आरक्षण मिळाल्यास आम्हालाही चांगले शिक्षण घेता येईल, अशी त्यांची मागणी आहे. मनोज जरांगे यांच्या आंदोलनास यश यावे त्यांची प्रकृती चांगली राहावी व सरकारला सुबुद्धी मिळावी, यासाठी देवाला साकडे घातले आहे.
देगावकर पाळणार सरकारचे सूतक
सकल मराठा समाजाला कुणबी मराठा आरक्षण मिळावे, यासाठी पंढरपूर तालुक्यातील देगाव, चळे, आंबे, मुंढेवाडी, पुळूज परिसरात साखळी उपोषण करण्यात येत आहे. यामध्ये देगाव येथे मराठा समाजाला आरक्षण न दिल्यास दिवाळी न करता सरकारचे सूतक पाळणार असल्याचे कार्यकर्ते सोमनाथ जाधव यांनी सांगितले. देगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर देगाव सकल मराठा समाज उपोषणास बसला आहे.