गड्डा यात्रेचे वेध लागले...नंदीध्वज घरोघरी निघाले !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2019 01:27 PM2019-11-26T13:27:47+5:302019-11-26T13:30:19+5:30
सोलापूर सिध्देश्वर यात्रा; हगलूरमध्ये नंदीध्वज पूजन सोहळा
सोलापूर : सोलापूरसह कर्नाटक आणि आंध्र, तेलंगणा येथील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वरांच्या यात्रेचे वेध लागले असून, घरोघरी होणाºया पूजेसाठी सरावाचे नंदीध्वज बाहेर पडले आहेत. उत्तर सोलापूर तालुक्यातील हगलूर येथील श्री सिद्धेश्वरभक्त प्रकाश हत्ती कुटुंबीयांच्या वतीने नंदीध्वजाचे विधिवत पूजन करण्यात आले.
नंदीध्वजास आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती. यावेळी नंदीध्वज मास्तर कुमार शिरसी, चंद्रकांत मेंडके, संगमेश्वर नीला, राजशेखर, गिरीश, सुरेश, मनोज हे हत्ती कुटुंबीय उपस्थित होते.
तत्पूर्वी सोलापुरातील तुळजापूर वेस ते हगलूर गावापर्यंत नंदीध्वज पेलण्याचा सराव करण्यात आला. मास्तर कुमार शिरसी, चंद्र्रकांत मेंडके, संगमेश्वर नीला यांच्या मार्गदर्शनाखाली गौरीशंकर विजापुरे, अमर दामा, धनराज खुबा, गजानन दामा यांनी सराव केला. या सरावात अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेणाºया शैलेश शेटे, संतोष घुगरे, बसवेश मठपती, शिवराज सालीमठ, तेजस इंडी यांनी चांगलाच सराव करीत युवाशक्तीचे दर्शन घडवले.
कार्तिकी पौर्णिमेनंतरच्या पहिल्या रविवारी यात्रेतील चौथ्या सराव नंदीध्वजधारकांनी हिप्परगा येथील मशरूम गणपतीची आरती करून सरावाची सुरुवात केली.
जवळपास पंचवीस ते तीस नंदीध्वजधारकांनी हगलूर ते सोलापूर असा काठी पेलण्याचा सराव केला. सूर्योदय ते सूर्यास्त असा हा नंदीध्वज पेलण्याचा सराव सुरू असतो.