देवीच्या तलवार, त्रिशुल, चक्रला चकाकी, किरीट, कंबरपट्टा, बाजुबंदला झळाळी; सोलापुरातील आठ करागिर कलाकुसरीच्या कामात मग्न
By काशिनाथ वाघमारे | Published: October 5, 2023 05:58 PM2023-10-05T17:58:32+5:302023-10-05T17:58:40+5:30
घटस्थापनेला नऊ दिवस राहिले असून नवरात्र मंडळांच्या देवीच्या आयुधांना चकाकी आणि तिच्या दागिन्यांना झळाळी देण्याचे काम सुरू झाले आहे.
सोलापूर : घटस्थापनेला नऊ दिवस राहिले असून नवरात्र मंडळांच्या देवीच्या आयुधांना चकाकी आणि तिच्या दागिन्यांना झळाळी देण्याचे काम सुरू झाले आहे. सोलापूर शहरात केवळ आठ कारागिर असून रात्रीचा दिवस करुन ही कामे केली जात आहेत. नवरात्रोत्सवात देवीला नऊ दिवस विविध रुपात, अवतारात सजवण्याची परंपरा सर्वत्र आहे. त्यामुळे तिची दागिने आणि आयुधं (शस्त्रं) ही स्वच्छ करुन तिला चकाकी देण्याचे काम नवरात्रोत्सवापूर्वी होत असते. वापरातील देवीच्या मनी मंगळसूत्रापासून ते नेकलेसपर्यंतची सर्वच दागिने आणि शस्त्रांना उजळवण्यासाठी कार्यकर्त्यांची धडपड सुरू आहे.
सोलापूर शहरात सराफ व्यवसायिकांचा संख्या मोठी आहे, मात्र कारागिरांची संख्या केवळ आठ आहे. यंदा मजुरीत आणि अॅसीडसह इतर लागणा-या साहित्यांच्या दरात वाढ झाली आहे. त्यामुळे पूर्वी चकाकी अन झळाळीसाठी दीड, दोन हजारांचा खर्च यायचा. आता तो अडीच हजारांव गेला आहे.
थाळीव कामाला लागतो वेळ
देवीचे चांदीचे किरीट, बाजुबंद, कंबरपट्टा, प्रभावळी या दागिन्यांसह त्रिशुल, तलवार, गदा, चक्र या आयुधांवर नक्षीकाम मोठ्या प्रमाणात असते. यालाच थाळीव काम म्हणतात. हे काम किचकट आणि वेळखाऊपणाचे आहे. त्यामुळे ही कामं वर्ष ते दहा महिने आधीपासून बूक होतात. हीच कामं ब-याचदा सराफ व्यवसायिकाकडे मंडळाकडून येतात. ती सराफांच्या माध्यमातून कारागिरांकडे येतात.