भक्तिभावाने भगवंताचा प्रकटोत्सव
By Admin | Published: May 12, 2014 01:16 AM2014-05-12T01:16:41+5:302014-05-12T01:16:41+5:30
आध्यात्मिक, धार्मिक कार्यक्रम : सुधीर चव्हाण यांना पूजेचा मान
बार्शी : बार्शीकरांचे आराध्य दैवत असलेल्या श्री भगवंताचा प्रकटोत्सव दिन बार्शीतील भगवंत मंदिरात विविध धार्मिक व आध्यात्मिक कार्यक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला़ प्रकटोत्सव दिनानिमित्त बार्शीतील रणभोर बंधूंनी मंदिरासाठी दोन लाखांची देणगी दिली़ प्रकटोत्सवानिमित्ताने भगवंत मूर्तीस दही, दुधाचा अभिषेक घालण्यात आला़ त्यानंतर श्री भगवंतांना विविध रत्नजडीत सुवर्ण अलंकारांनी विभूषित करण्यात आले़ पहाटे काकडा आरती करण्यात आली़ वर्षातील पूजेचा मान हा भगवंत भक्तास देण्याची प्रथा असून यावर्षी तो मान बार्शीतील व्यावसायिक सुधीर चव्हाण यांना देण्यात आला़ त्यांच्या हस्ते सपत्नीक पूजा करण्यात आली़ देवस्थान समितीच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षी देखील लाडूच्या प्रसादाचे वाटप करण्यात आले़ दिवसभरात अनेक मंडळांच्या वतीने भाविकांना दुधाचे वाटप करण्यात आले़ यावेळी देवस्थान समितीचे सरपंच दादासाहेब बुडूख, सदस्य मुकुंद कुलकर्णी, मिठूशेठ सोमाणी, सत्यनारायण झंवर, अनिल देशमुख आदी उपस्थित होते़ प्रकटोत्सव दिनाच्या निमित्ताने दर्शनासाठी मंदिरात पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत भाविकांच्या रांगा लागल्या होत्या़ तसेच दिवसभर गर्दीने मंदिर परिसर फुलून गेला होता़ पहाटे प्रकटोत्सव सोहळा पार पडल्यानंतर प्रसादाचे वाटप करण्यात आले तर पत्रकार संघाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या महाप्रसादाला सुरुवात दुपारी बारा वाजता भगवंताची आरती करुन करण्यात आली़ महाप्रसादाचा लाभ शहरातील हजारो भाविकांनी घेतला़ यासाठी अजित कुंकूलोळ, नंदराज माढेकर, चंद्रकांत करडे, नामदेव पवार, प्रशांत काळे, आप्पा पवार, प्रशांत घोडके, अमोल आजबे, अरुण बळप, राहुल कुंभार, सागर वायकर, कपिल हिंगमिरे, अशोक कांबळे, सूर्यकांत हुक्कीरे ,बाळासाहेब तातेड, अभय कुंकुलोळ, संदीप सुराणा, दिनेश कांकरिया, आनंद सुराणा, रवी करवा, अविनाश तोष्णीवाल, सुवर्णा शिवपुरे, अमृता कुंकुलोळ यांनी परिश्रम घेतले. भगवंत जयंतीनिमित्त पत्रकार संघाच्या वतीने महाप्रसाद वाटपाचे यंदाचे चौथे वर्ष आहे़ महाप्रसाद घेण्यासाठी दिवसभर भक्तांनी होती़ यानिमित्ताने आठ दिवसांपासून मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती़ पहाटे जयंवत बोधले महाराज यांचे कीर्तन झाले़ तर सकाळी १० वाजता ह़ भ़ प़ पद्माकर देशमुख महाराज अमरावतीकर यांचे भागवत कथेवर निरुपण झाले़ भगवंत प्रकटोत्सवाचे औचित्य साधून शहरातील प्रवीण रणभोर व प्रताप रणभोरच्यावतीने देवस्थानला प्रत्येकी एक लाख रुपयांची देणगी दिली. या दोघा बंधूंचा देवस्थानचे अध्यक्ष दिलीप बुडूख यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला़ -------------------------------- सांस्कृतिक महोत्सवाचे आकर्षण ४गेल्या काही वर्षांपासून देवस्थान समिती व रोटरी क्लब बार्शी यांच्या संयुक्त विद्यमाने रोटरी सांस्कृतिक महोत्सव आयोजित केला जातो़ यामध्ये धार्मिक कार्यक्रमांबरोबरच बार्शीकरांची बौध्दिक व वैचारिक भूक भागवण्याचे कामदेखील या महोत्सवाने केले जाते. सात दिवस या कार्यक्रमांसाठी मंदिरात मोठी गर्दी होत होती़