गणरायाच्या स्वागताला सोन्याचे गजराज; मुकूट अन् अलंकारांनाही झळाळी चांदीची
By काशिनाथ वाघमारे | Published: September 15, 2023 07:09 PM2023-09-15T19:09:16+5:302023-09-15T19:09:31+5:30
घराघरात आनंद वाढवणा-या गणरायाचे मंगळवारी आगमन होत आहे.
सोलापूर : घराघरात आनंद वाढवणा-या गणरायाचे मंगळवारी आगमन होत आहे. लाडक्या बाप्पाच्या स्वागताला यंदाही सोन्याचा गजराज आणि चांदीची आभुषणं आली आहेत. सार्वजनिक मंडळांपेक्षा घरगुती गणरायाच्या सजावटीत चांदीच्या अलंकारांना सर्वाधीक मागणी आहे.
देवाच्या दागिन्यांचा वापर हा अहमदनगरसह पश्चीम महाराष्ट्रात सर्वाधीक आहे. गेल्या दहा वर्षात चांदींच्या आभुषणांचा आणि मागील पाच वर्षात त्याबरोबर सोन्याच्या वस्तुंचाही वापर वाढत गेला. गणरायाच्या काणातील फुलं, किरीट, गळ्यातील हारदेखील चांदीपासून बनवली गेली आहेत. त्यासाठीची घडणावळ १० ते ३० टक्के असते. आता या तयार वस्तू बाजारात उपलब्ध झाल्या आहेत. विशेषत: १ सप्टेंबरपासून चांदीचा दर (७१,५०० रु. किलो) ही स्थीर आहे. नवरात्रपर्यंत तो स्थीर राहील असे सराफ व्यवसायिकातून सांगितले जाते.
देवांच्या आभुषणांसाठी बालगोपाळ, महिलांची पावलं ही सराफ बाजाराकडे वळाली आहेत. बहुतांश आभुषणं अर्थात कमळसह त्रिशुल, गदा, चक्र, परशु ही शस्त्रही चांदीत बनवलेली अनेक प्रकारात आढळताहेत. मोदक, जाणवं, दुवार्ची जुडी, हातात बांधला जाणारा गजरा आणि मुशकही चांदीत बनवलेली आहेत.
बाहेरगावाहून मुलं येताहेत दागिने घेऊन
नोकरीनिमित्त बऱ्याच कुटूंबातील मुलं, मुलीही पुणे, मंबई शहरात स्थायिक झाली आहेत. या गणेशोत्सवात ही मुलं घरी येताना ते चांदीची आभुषणं आणताहेत. अगदी लहान वस्तुंपैकी कानातील फुलं आणि कमी वजनाची दागिने १५ ग्रॅम ते किलो वजनात बनताहेत. काही दागिने ५०० रुपयांपासून उपलब्ध होतात. बाहेर गावाहून येताना ही दागिने मुलं घरच्या गणपतीसाठी घेऊन येताहेत.