आठवड्यातच सोनं साडेचार हजारांनी महागलं; कमी वजनाचे दागिने गोडवा वाढवणार
By काशिनाथ वाघमारे | Published: March 18, 2023 05:01 PM2023-03-18T17:01:41+5:302023-03-18T17:02:33+5:30
बुधवारी गुढी पाडवा : जुन्या दागिन्यांचा एक्स्चेंज वाढला
काशिनाथ वाघमारे
सोलापूर : साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त म्हणून गुढी पाडवा चार दिवसांवर येऊन ठेपला आहे. मात्र, मागील आठवडाभरात सोने दरात चक्क साडेचार हजारांनी वाढ झाली आहे. या दरवाढीवर गृहिणींनी कमी वजनाचे दागिने घेऊन मात करीत मुहूर्त साधताहेत. दरवाढीतही खरेदीचा गोडवा वाढवण्यासाठी काही सराफींनी किमान १५ ग्रॅम सोने खरेदीवर २०० मिलीग्रॅम सोन्याची नानी मोफत देऊ केली आहे.
यंदा सोने दरात आठवडभरात वाढ झाली असली तरी बुकिंगचे प्रमाण कमी झालेले नाही. मुहूर्तावर दागिने खरेदी करण्यासाठी एरव्हीच्या खरेदीला काही हौशिवंत गृहिणींनी ब्रेक लावला आहे. दहा ग्रॅम खरेदीऐवजी पाच ग्रॅम खरेदी पाडव्याचा गोडवा घेण्यासाठी १५ दिवस, महिनाभरापूर्वीची बुकिंग सिस्टम पाळली आहे. कोणत्याही परिस्थिती शुद्धतेच्या बाबतीत सर्वसामान्य तडजोड करताना दिसत नाहीत.
मंगळसूत्र व्हरायटी
दरवाढीतही यंदाचा गुढी पाडवा सहज करवून सोडण्यासाठी दागिन्यातील नावीन्यता ग्राहकांच्या पुढ्यात ठेवताहेत. नियमती ब्रेसलेट, सोन्याची चैन, पिळ्याची अंगठी, नथ, बाजुबंद पारंपरिक दागिने दाखविले जाताहेत. खरेदीचा उत्साह टिकवून ठेवण्यासाठी यंदा नवीन मंगळसूत्र व्हरायटी प्रकार पुढे आणला आहे. ट्रेडीशनमध्ये राणीहार, चपला हार, पोहेहार, मोहनमाळ, पाटल्या, गहू तोडे प्रकारातील दागिने उपलब्ध केले आहेत.
शुक्रवारी दर पोहोचला ६० हजारांवर
शुक्रवारी २४ कॅरेट सोन्याचा दर ६० हजारांवर स्थिरावला. याच २४ कॅरेटचा दर आठवड्यापूर्वी दर ५६ हजारांवर होता. आठवड्यापूर्वी २२ कॅरेट दागिन्याचा दर ५२,५०० होता तर शुक्रवारी दर ५५ हजारांवर स्थिरावला. शनिवारी दरात फारसा बदल नव्हता. मागील गुढीपाडव्याच्या दिवसी सोन्याचा दर ५२ हजार होता.