चहासाठी उतरला आणि ८ लाखांचे दागिने गायब; कलबुर्गी-कोल्हापूर रेल्वेत हातसफाई
By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2024 08:42 AM2024-02-23T08:42:54+5:302024-02-23T08:43:31+5:30
या बॅगेत सोन्याची माळ ,पेट्या, बोरमाळ, पेंडल, वज्रटिक असे एकूण १३२ ग्रॅम वजनाचे ८ लाख ३१ हजार रुपयांचे दागिने व रोख साडेतीन लाख रुपये असे एकूण ११ लाख ८१ हजार रुपयांचा ऐवज होता.
कुर्डुवाडी (सोलापूर) : कलबुर्गी-कोल्हापूर एक्स्प्रेसमधून प्रवास करणाऱ्या काेल्हापूरच्या व्यापाऱ्याचे सुमारे ८ लाख ३१ हजारांचे दागिने व रोख रक्कम साडेतीन लाख असा एकूण ११ लाख ८१ हजार रुपयांचा ऐवज असलेली बॅग अज्ञात चोरट्याने लांबविली. मात्र लोहमार्ग पोलिसांच्या सतर्कतेमुळे ३ लाख ५० हजार रुपये रोकड पुन्हा मिळाली.
फिर्यादी सोने व्यापारी भारत रामचंद्र हसूरकर (रा. कोल्हापूर) हे सोन्याचे दागिने तयार करून गावोगावी विकण्याचे काम करतात. १९ फेब्रुवारी रोजी ते कलबुर्गी येथे गेले होते. तेथील काम आटोपून २१ फेब्रुवारी रोजी कलबुर्गी-कोल्हापूर एक्स्प्रेसने कोल्हापूरला जाण्यासाठी सकाळी ६.४० वाजता निघाले होते. गाडी कुर्डूवाडी रेल्वे स्थानकात प्लॅटफॉर्म क्र. २ वर सकाळी ९.५० वाजता पोहचली असता ते चहा पिण्यासाठी खाली उतरले. त्यांनी खिडकीतून पाहिल्यावर सीटवर ठेवलेली बॅग दिसली नाही. या बॅगेत सोन्याची माळ ,पेट्या, बोरमाळ, पेंडल, वज्रटिक असे एकूण १३२ ग्रॅम वजनाचे ८ लाख ३१ हजार रुपयांचे दागिने व रोख साडेतीन लाख रुपये असे एकूण ११ लाख ८१ हजार रुपयांचा ऐवज होता. त्यानंतर हसूरकर यांनी पोलिसात तक्रार केली.