शहरातील याठिकाणी मिळेल आयुषमान योजनेचे गोल्डन कार्ड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2020 11:01 AM2020-03-07T11:01:12+5:302020-03-07T11:03:01+5:30
मनपाच्या १२ आरोग्य केंद्रांत काम सुरू; पाच लाखांपर्यंत मोफत उपचार, ‘पीएमओ’कडून पत्र आलेल्यांना लाभ
सोलापूर : केंद्र शासनाच्या आयुषमान भारत योजनेत पात्र ठरलेल्या नागरिकांना गोल्डन कार्ड देण्यासाठी महापालिकेने १२ केंद्रे सुरू केली आहेत. पंतप्रधान कार्यालयाकडून पत्र आलेल्या नागरिकांनी या केंद्रांत जाऊन कार्ड काढावे, असे आवाहन मनपा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले केले.
डॉ. नवले म्हणाले, आयुषमान योजनेचे शहरात ५८ हजार लाभार्थी आहेत. यापैकी १८ हजार लाभार्थ्यांकडे गोल्डन कार्ड होते. उर्वरित लाभार्थ्यांना कार्ड काढण्यासाठी मनपाच्या शेळगी, मजरेवाडी, सोरेगाव, बाळे, रामवाडी, अक्कलकोट रोड मुद्रा सन सिटी, विडी घरकूल, दाराशा, भावनाऋषी, डफरीन चौक या आरोग्य केंद्रांत सोय करण्यात आली आहे. महापालिका केवळ ३० रुपयांत कार्ड काढून देत आहे. लाभार्थ्यांना पंतप्रधान कार्यालयाकडून पत्र आले असेल हे पत्र, रेशनकार्ड, आधारकार्ड आदी कागदपत्रे घेऊन नागरिकांनी या केंद्रामध्ये जावे. महिनाभरात सर्वच लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असेल, असेही डॉ. नवले यांनी सांगितले.
आयुक्त घेताहेत नियमित आढावा
- आयुषमान भारत योजनेतील कार्ड काढण्याच्या मोहिमेचा मनपा आयुक्त दीपक तावरे हे नियमितपणे आढावा घेत आहेत़ आयुक्तांनी बुधवारी रामवाडी, सोरेगाव, मजरेवाडी, नई जिंदगी, चाकोते हॉस्पिटल या ठिकाणी भेट देऊन कामांची पाहणी केली होती. आशा वर्करच्या माध्यमातून लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जात आहे.
आयुषमान योजनेत पात्र असलेल्या लाभार्थ्यांना शासनाने निश्चित केलेल्या रुग्णालयात पाच लाखांपर्यंतचे मोफत उपचार मिळतात. यासाठी २०११ मध्ये सर्वेक्षण झाले होते. त्यावेळी ज्यांचे नाव यादीत आले त्यांनाच पंतप्रधान कार्यालयाकडून पत्रे आली आहेत. यातील काही लाभार्थी स्थलांतरित झाले आहेत. उर्वरित लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न महापालिका करीत आहे. पंतप्रधान कार्यालयाकडून पत्र प्राप्त झालेल्या नागरिकांनी जवळच्या मनपा आरोग्य केंद्रात संपर्क करावा.
-डॉ. संतोष नवले,
आरोग्य अधिकारी, मनपा.