ठेकेदारामार्फत घेणार घंटागाडी कर्मचारी, सोलापूर महानगरपालिकेने निविदा उघडली, सामान्य प्रशासनाचा पदभार बदलला !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2018 03:11 PM2018-01-09T15:11:49+5:302018-01-09T15:12:44+5:30
अचानक कामबंद आंदोलन व केबीनसमोर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न या गोष्टी कंत्राटी घंटागाडी कर्मचाºयांना महागात पडल्या आहेत. या सर्वांना मनपाच्या कंत्राटी कामातून मुक्त करण्यात आले असून, ठेकेदारांमार्फत मजूर घेण्याची तयारी प्रशासनाने केली आहे.
आॅनलाइन लोकमत सोलापूर
सोलापूर दि ९ : अचानक कामबंद आंदोलन व केबीनसमोर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न या गोष्टी कंत्राटी घंटागाडी कर्मचाºयांना महागात पडल्या आहेत. या सर्वांना मनपाच्या कंत्राटी कामातून मुक्त करण्यात आले असून, ठेकेदारांमार्फत मजूर घेण्याची तयारी प्रशासनाने केली आहे.
दोन वर्षांपूर्वी ऐन गड्डायात्रेवेळी समीक्षाने कामबंद केल्यावर तत्कालीन आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी आपल्या अधिकारात कंत्राटी कर्मचाºयांच्या नियुक्त्या करून घंटागाड्या सुरू केल्या. झोनचा कचरा ठेकेदारामार्फत उचलला जात होता. त्यानंतरचे आयुक्त काळम यांनी कचरा संकलनाचे खासगीकरण केले. नवीन ठेका मंजूर करून घंटागाडी मजुरांना घरी पाठविण्याची तयारी केली. पण आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांना या ठेक्यात काळेबेरे झाल्याचे दिसून आल्यावर खासगीकरण रद्द केले. आहे त्या कर्मचाºयांवर त्यांनी कचरा संकलन सुरू केले. कंत्राटी कर्मचारी काम व्यवस्थित करीत असल्याचे दिसून आल्यावर त्यांना किमान वेतनानुसार पगार देण्याची तयारी केली होती. असे असताना घंटागाडी कर्मचाºयांनी संघटनेचा आधार घेत आंदोलन करून प्रशासनावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. त्याच रात्री मजूर पुरविण्याचा ठेका जारी करण्यात आला.
या ठेक्याची निविदा सोमवारी उघडण्यात आली. यात भाग घेतलेल्या ठेकेदारांबरोबर उपायुक्त त्रिंबक ढेंगळे-पाटील यांनी कामाच्या स्वरूपाबाबत चर्चा केली. झोननिहाय संस्थेने घंटागाडी चालक व मजूर पुरवायचे आहेत. या सर्वांना किमान वेतनानुसार मनपा पगार संस्थेकडे जमा करेल. संस्थांनी त्यांच्या सेवाबिलाची रक्कम सादर करायची आहे. संस्थेने पुरवठा केलेल्या मजुरांचा मनपाशी कसलाही संबंध राहणार नाही. संबंधित संस्थेला ११ महिन्यांचा मजूर पुरवठ्याचा ठेका असणार आहे. मजुरांना साहित्य व वाहने मनपा पुरविणार आहे. सर्व घंटागाड्यांना जीपीएस यंत्रणा असल्याने ठरवून दिल्याप्रमाणे मजुरांना आठ तास काम करावे लागेल. खाडे व कामातील चुकांबाबत ठेकेदाराला जबाबदार धरले जाणार आहे. सध्या कर्मचारी नसल्याने बºयाच ठिकाणी गेल्या पंधरा दिवसात घंटागाड्या गेलेल्या नाहीत.
त्यामुळे घराघरांत कचरा साठला आहे. नागरिकांना नेमका काय पेच निर्माण झाला हे माहीत नसल्याने पुन्हा कचरा वाटेल त्या ठिकाणी फेकला जात आहे. नागरिकांनी असे न करता कचरा साठवून ठेवावा. आठवड्यात घंटागाड्याचे नियोजन पूर्ववत होणार असल्याचे ढेंगळे—पाटील यांनी सांगितले.
-------------------------
आयुक्तांनी घातले लक्ष
आयुक्त डॉ. ढाकणे यांनी कामाचा निपटारा होण्यासाठी ई फायलिंग सिस्टिम सुरू केली आहे. यात कोणती फाईल कोणाकडे प्रलंंबित राहिली हे दिसून येते.घंटागाडी कर्मचाºयांची व दवाखान्याची औषध खरेदीची फाईल अपर आयुक्त श्रीकांत मायकलवार यांच्याकडे बराच काळ प्रलंबित असल्याचे दिसून आले.घंटागाडी कर्मचाºयांची फाईल २७ दिवस प्रलंबित होती.त्यामुळे याची दखल घेत आयुक्त डॉ.ढाकणे यांनी मायकलवार यांच्याकडील सामान्य प्रशासन व आरोग्य विभागाचा पदभार काढून ढेंगळे—पाटील यांच्याकडे दिला आहे.यापूर्वी एलबीटीचा पदभार अशाच प्रकारे काढण्यात आला होता.