सोलापूरातील नगरसेविकांनी सुचविलेल्या कामांवर आले गंडांतर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2018 12:13 PM2018-04-15T12:13:18+5:302018-04-15T12:13:18+5:30
मनपा आयुक्त अविनाश ढाकणे यांचा आदेश: खासगी सोसायट्यांमधील कामे नाहीत
सोलापूर: नगरसेवकांनी भांडवली निधीतून सुचविलेल्या खासगी सोसायट्यांमधील रस्ते, दिवाबत्तीच्या कामांवर आयुक्तांच्या आदेशान्वये गंडांतर आले आहे.
महापालिकेत सत्तांतर झाल्यापासून नवीन नगरसेवकांना प्रभागात विकासकामे करण्यासाठी निधी मिळाला नव्हता. करवसुलीतून तिजोरीत थोडीशी पुंजी जमा झाल्यानंतर आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी गरजेच्या कामांना निधी देण्यास सुरुवात केली आहे. पण ही कामे खासगी सोसायट्यांमध्ये करायची नाहीत, अशी तंबी विभागीय अधिकाºयांना दिली आहे.
शासन अध्यादेशानुसार लोकप्रतिनिधींच्या विकास निधीतून कोणत्या प्रकारची कामे घ्यावीत याचे निकष ठरलेले आहेत. त्याप्रमाणेच कार्यवाही झाली पाहिजे, असे आदेश आयुक्त डॉ. ढाकणे यांनी दिले आहेत. शासनाकडून आलेला निधी व मनपाचा पैसा खासगी जागांपेक्षा सरकारी जागा विकसित करण्यावर भर द्यावा, असे सूचित केले आहे. त्यामुळे डिसेंबरअखेर सर्वच नगरसेवकांनी प्रभागातील सुचविलेली बहुतांश कामे सोसायट्यांमधील रस्ते, ड्रेनेज, दिवाबत्ती करण्याची आहेत. या नियमामुळे या विकासकामांना खीळ बसणार आहे.
एकीकडे ठेकेदारांची बिले मोठ्या प्रमाणावर थकल्याने मनपाची कामे करण्यास कोणी तयार नाही. जे ठेकेदार काम करीत आहेत, त्यांच्याकडून गुणवत्तेबाबत साशंका आहे. जुनी पोलीस लाईनमध्ये ड्रेनेजलाईन बदलण्याचे काम सुरू आहे. यामुळे प्रॉपर्टी कनेक्शन तुटले आहेत. हे कनेक्शन जोडण्यासाठी ठेकेदाराकडून पैशाची मागणी केली जात आहे, अशा नागरिकांच्या तक्रारी आहेत. यापुढे प्लॉटिंग विकासकांना परवानगी देताना रस्ते, ड्रेनेज, दिवाबत्तीची कामे झाल्याची खात्री केली जाणार आहे. अशी कामे पूर्ण केलेली असली तरच प्लॉटिंगला परवानगी दिली जाणार असल्याचे आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी स्पष्ट केले आहे.
यामुळे झाला बदल
- आयुक्त डॉ. ढाकणे यांनी खासगी सोसायट्यांना सुविधा बंदचा फतवा यामुळे काढला. इंदिरानगर सोसायटीतील रस्त्यांचा वाद निर्माण झाला. सोसायटीने रस्ते आम वाहतुकीसाठी बंद केले. याबाबत मनपाकडे तक्रार आल्यावर विभागीय अधिकाºयांनी दखल घेतली. त्यावेळी सोसायटीधारकांनी रस्त्यावर फक्त सोसायटीचा हक्क आहे. हस्तक्षेप करण्याचा मनपाचा काय संबंध, असा सवाल उपस्थित केला. वास्तविक हे रस्ते मनपाने केलेले होते. पण सोसायटीधारकांनी कायद्यात पकडल्यामुळे आता हा जाच सर्व खासगी सोसायटीधारकांना सोसावा लागणार आहे.
प्लॉट घेताना खात्री करा
- नागरिकांनी शहर किंवा हद्दवाढ भागात यापुढे प्लॉट घेताना विकासकाने रस्ते, ड्रेनेज, दिवाबत्ती आणि जलवाहिनीची सोय केली आहे की नाही हे तपासा. आतापर्यंत हद्दवाढ भागात जी नगरे वसली, त्यात या बाबी नागरिकांनी पाहिल्याच नाहीत. आता महापालिकेने या सुविधा द्याव्यात, अशा मागण्या केल्या जात आहेत. त्यासाठी नागरिकांनी सोसायट्यांची स्थापना करून रितसर मनपाकडे हस्तांतरित करणे गरजेचे आहे.