बळीराजाला चांगले दिवस येणार, पोखरापूर यात्रेतील भाकणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2017 03:56 PM2017-10-23T15:56:12+5:302017-10-23T15:58:48+5:30
‘विठ्ठल-बिरुदेवाचं चांगभलं’च्या जयघोषात भंडाºयाची उधळण करीत पोखरापूर येथील विठ्ठल-बिरुदेवाची यात्रा दिवाळी पाडव्यादिवशी गुरू-शिष्य भेटीच्या सोहळ्याने पार पडली.
आॅनलाइन लोकमत सोलापूर
मोहोळ दि २३ : ‘विठ्ठल-बिरुदेवाचं चांगभलं’च्या जयघोषात भंडाºयाची उधळण करीत पोखरापूर येथील विठ्ठल-बिरुदेवाची यात्रा दिवाळी पाडव्यादिवशी गुरू-शिष्य भेटीच्या सोहळ्याने पार पडली. विठ्ठल-बिरुदेवाचं चांगभलं म्हणत तीस हजार भाविकांनी दर्शन घेतले.
धनगर समाजाचे आराध्य दैवत असलेल्या विठ्ठल-बिरुदेवाच्या यात्रेला सर्व जातीधर्माचे लोक सहभागी झाले होते. विठ्ठल-बिरुदेवाची मनोभावे पूजा करणारे भक्त खेलोबा पुजारी हे पोखरापूर-आढेगावच्या दरम्यान असलेल्या माळरानावर मेंढ्या चारण्यासाठी येत. त्या माळाला दंडाचा माळ या नावाने ओळखले जाते.
याच माळावर खेलोबा याच भक्ताला भेटण्यास कोल्हापूर जिल्ह्यातील पट्टणकोडोली येथून विठ्ठल-बिरुदेव (बंधू) आले होते. तो दिवस म्हणजे दिवाळी पाडव्याचा दिवस. भक्त खेलोबा पुजारी यांनी २४ वर्षे विठ्ठल-बिरुदेवाची आराधना केली. त्यामुळे प्रसन्न होऊन विठ्ठल-बिरुदेव भक्त खेलोबा पुजारी यांना भेटायला आले. तो दिवस म्हणजे दिवाळी पाडव्याचा होय. या दिवशी दरवर्षी यात्रा भरते.
यात्रेला धनाजी विठोबाची यात्रा असे संबोधले जाते. या दिवशी दुपारी तीन वाजता पोखरापूर गावातून विठ्ठलाची कन्या भागुबाईची पालखी वाजत-गाजत विठ्ठल मंदिराकडे निघते. सोबत छबिना, ढोल, देवाची छत्री, शिंग, निशाणासह वाजत गाजत जाते. यंदा पावसाचे प्रमाण समाधानकारक असल्याने यात्रेला आलेल्या भाविकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला होता. यावेळी झालेल्या भाकणुकीत आगामी काळात बळीराजाला चांगले दिवस येतील अशी देवाची भाकणूक झाली आहे. दिवसभर भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी झाली होती. पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.